नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना लाच प्रकरणात फरार नाट्यानंतर अटक होऊन जामीनही झाला. परंतु, त्यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई आणि प्रभारी अधिकारी नियुक्तीत झालेल्या विलंबामुळे जिल्ह्यातील जवळपास १८ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फटका बसला. त्यांचे जुलै महिन्याचे वेतन रखडल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणीतच रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेचा सण साजरा करावा लागला. त्यामुळे शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटू लागल्याने अखेर शिक्षकांच्या वेतनाची गंभीर बनलेली समस्या सोडविण्यासाठी प्रभारी शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सहायक शिक्षण उपसंचालक पुष्पा पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी कार्यतत्परता दाखवत प्राधान्यक्रमाने शिक्षकांच्या वेतन देयकांवर स्वाक्षऱ्याही केल्या. परंतु, त्यानंतर आठवडा उलटूनही शिक्षकांचे वेतन होऊ शकलेले नाही. यातून शिक्षण विभागातील संथ कार्यपद्धतीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीत कोरोना संकट काळात कुटुंबासमोरील आर्थिक प्रश्नांचा सामना करतानाच ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षणावर लक्ष केंद्रित करताना शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक साहित्य, इंटरनेट सुविधांसाठीही खर्च करावा लागतो आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शिक्षकांची अवस्था सध्या रसद तुटलेल्या सैनिकांप्रमाणे झाली आहे. परंतु, अशा बिकट परिस्थितीतही समाजाची शैक्षणिकदृष्ट्या सुदृढ भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांना अध्यापनाचे स्वीकारलेले व्रत अविरत सुरू ठेवावेच लागणार आहे. त्याची फलश्रुती महिनाअखेरपर्यंत जुलैच्या वेतनाच्या स्वरूपात निश्चित होईल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
रसद तुटलेल्या सैनिकांप्रमाणेच शिक्षकांची अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:17 AM