नाशिक : शैक्षणिक संस्थेने बोलविलेल्या पालकांच्या बैठकीत विनापरवानगी प्रचार केल्याप्रकरणी मध्य नाशिक मतदारसंघामध्ये शनिवारी (दि.१९) पोलिसांत गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडाळारोडवरील एका लॉन्समध्ये गुरुवारी एका शाळेच्या शिक्षक-पालक बैठक सुरू होती. यावेळी एका उमेदवाराने समर्थकासमवेत हजेरी लावून सूक्ष्म अधिकारी यांची परवानगी न घेता निवडणूक प्रचार केल्याने त्यांच्याविरुद्ध निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, नाशिक पश्चिम मतदारसंघातदेखील सातपूर भागात मतदानासाठी प्रलोभन म्हणून पैसे वाटणाऱ्या दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्रसिंग पवार (रा. त्र्यंबकेश्वर) आणि अनिल शेवाळे यांना भरारी पथकाने पकडल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली. तसेच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये त्यांना हद्दपार करण्यात आले आहे.