नाशिक : जिल्हा परिषदेच्या कामकाजात सुसूत्रता यावी आणि सदस्यांची कामे तत्काळ व्हावी, यामध्ये अडसर ठरू पाहणाऱ्या मुख्यालयातील सर्वच विभागांचे कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांच्या तत्काळ अंतर्गत बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी उपाध्यक्ष प्रकाश वडजे व सभापती केदा अहेर यांनी प्रशासनाकडे केली आहे.या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या गोपनीय पत्रात मुख्यालयातील बहुतांश कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक यांच्याबाबत जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रारी केल्या असून, खातेप्रमुखांपेक्षा कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकच विभागाचे कामकाज चालवित असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. त्यामुळे वैतागलेल्या उपाध्यक्ष प्रकाश वडजे व कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या नावे गोपनीय पत्र देऊन मुख्यालयात कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, काही महत्त्वाच्या विभागांत असलेले कार्यालयीन अधीक्षक व कक्ष अधिकारी स्वत:लाच खातेप्रमुख समजत असून, त्यांच्यामुळे जनतेची व विकासाची कामे होत नसल्याचा आरोप या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सहापैकी दोन पदाधिकाऱ्यांनीच आता कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक यांच्या बदल्या करण्याची मागणी केल्याने आणि त्यात एक उपाध्यक्ष असल्याने प्रशासनाला आता या कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याची कार्यवाही करावीच लागणार आहे. त्यामुळे कार्यालयीन अधीक्षक व कक्ष अधिकारी यांच्या डोक्यावर आता अंतर्गत बदल्यांची टांगती तलवार आहे. त्यातही काही कार्यालयीन अधीक्षक व कक्ष अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून असल्याने त्यांचाच त्रास जास्त होत असल्याचे सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
अधिकारी बदलीच्या मागणीचे गोपनीय पत्र
By admin | Published: January 15, 2015 12:09 AM