वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कर्मचारी
नाशिक : मेनरोड, धुमाळ पॉइंट या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम सुरू असून, वर्दळीमुळे या मार्गावर वाहनांची कोंडी होत आहे. येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खोदकामावरील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून, हे कर्मचारी वाहनांचा वाट मोकळी करून देत आहेत.
रेशन दुकानांची तपासणी सुरू
नाशिक : जिल्ह्यात सध्या मोफत धान्य वितरण केले जात असल्याने जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची तपासणी केली जात आहे. शहर आणि तालुक्याच्या ठिकाणीदेखील पुरवठा निरीक्षकांच्या माध्यमातून रेशन दुकानांच्या नोंदीची पडताळणी केली जात आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तपासणी सुरू करण्यात आली आहे.
लसीकरण केंद्राजवळ वाहनांची गर्दी
नाशिक : उपनगर येथील प्राथमिक आरेाग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्यांची मोठी गर्दी होत असल्याने रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच गर्दी होत असते. केंद्राच्या बाजूलाच मोठी रहिवासी वसाहत तर दुसऱ्या बाजूला बाजारपेठदेखील आहे. लसीकरण नसताना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळताे.
बेड रिक्त झाल्याने दिलासा
नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन तसेच नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने येथील बेड्स मेाठ्या प्रमाणात रिकामे झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला असून, बाधितांना तत्काळ उपचार उपलब्ध होत आहे. गेल्या महिनाभरापासून मनपा रुग्णालयांतील रुग्ण कमी होत आहेत.
आयएमएच्या वतीने आज निषेध दिन
नाशिक : कोरोनाकाळात अनेक डॉक्टरांवर हल्ले झाल्याने डॉक्टरांना संरक्षण मिळावे तसेच या संदर्भात दाखल खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १८) सर्वत्र निषेध दिन पाळण्यात येणार आहे. नाशिकमध्येदेखील निषेध केला जाणार असल्याची माहिती आयएमएच्या वतीने देण्यात आली.