पंचवटी : कोरोना कालावधीत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी तसेच नागरिकांना मोफत गोळ्या वाटप, प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी व औषध फवारणी करण्यासाठी पंचवटी विभागातील सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये चढाओढ लागली असून, कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या कामाचे सोशल माध्यमात छायाचित्रे व संदेश पाठविण्यावरून द्वंद सुरू झाले आहे. त्यातून लोकप्रतिनिधींच्या समर्थकांमध्ये विनाकारण वाद वाढू लागले आहेत.नाशिक शहरात कोरोनाचे रुग्णवाढीस लागले असून, दररोज शेकडोच्या संख्येने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हे करताना आरोग्य यंत्रणेने संबंधित प्रभागाच्या लोकप्रतिनिधींना सोबत घ्यावे अशा सूचना आयुक्तांनी केली आहे. मात्र बऱ्याचशा प्रभागात परस्पर विरोधी पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे त्यांच्याकडून विशिष्ट भागात तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला केली जात असलेली सक्तीवरून वादाचे प्रकार घडू लागले आहेत.केवळ आपल्यामुळे प्रभागातील नागरिकांची तपासणी झाली, नागरिकांना मोफत गोळ्या मिळाल्या व कोरोना रुग्ण आढळून आलेल्या भागात औषध फवारणी केली गेली, असे मजकूर असलेले संदेश सोशल माध्यमातून प्रसारित केले जात आहेत. त्यामुळे साहजिकच प्रभागातील अन्य नगरसेवक व त्यांच्या समर्थकांमध्ये चढाओढ सुरू होऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे.----------------------शहरातील सर्वच प्रभागातील आरोग्य तपासणी सुरू करण्यात आलेली असली तरी, सोशल माध्यमाचा अधिकाधिक वापर लोकप्रतिनिधींकडून केला जात असून, त्यातही आपणच कसे पोटतिकडीने काम करीत आहोत हे दाखविण्यासाठी लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांच्या घोळक्याने प्रभागात फिरत आहेत. त्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडविला जात आहे. एकीकडे नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले जात आहे.दुसरीकडे मात्र लोकप्रतिनिधींकडूनच त्याचे उल्लंघन केले जात आहे. प्रभागातील जनतेची काळजी घेणे प्रत्येक लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असले तरी, त्यासाठी श्रेय घेण्यासाठी केल्या जात असलेल्या खटपटी नागरिकांनाही खटकत आहेत. पंचवटीत या साºया घटनांवरून नागरिकांचे मनोरंजनही होत आहे.
पंचवटीत श्रेयवादावरून लोकप्रतिनिधींमध्ये द्वंद्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 10:12 PM