साकोरा : नांदगाव तालुक्यात गत सत्तर वर्षात शासनाने एकही सिंचन योजना न दिल्याने तीन पिढ्या बरबाद झाल्या असून, येणाऱ्या पिढीच्या तोंडात तरी माती पडू न देता तालुक्यातील जनतेने नार-पार प्रकल्पाच्या पाण्यासाठी एकजुटीने संघर्ष उभा करावा, असे आवाहन तालुका सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी साकोरा येथे केले. कोरा येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्वात दुष्काळी असलेला नांदगाव तालुक्याचा गेल्या पन्नास वर्षातील विकासाचा अनुशेष भरून काढून येणाºया पिढीला तरी अच्छे दिन पहायला व उपभोगायला मिळावेत म्हणून आपण आजच्या पिढीने नार- पारच्या पाण्याची तरतूद करून ठेवायला पाहिजे. केवळ शेती सुजलाम करून चालणार नाही तर परिसराचा औद्योगिक व शैक्षणिक विकासही झाला पाहिजे. त्यासाठी नांदगाव तालुक्याचा नार-पारच्या डीपीआरमध्ये समावेश करण्यासाठीचा पहिला लढा उभारूया, असे आवाहन परदेशी यांनी केले.रमेश बोरसे म्हणाले की, नार - पार प्रकल्पासंदर्भात तालुक्याच्या खेडोपाडी स्वत: पदरमोड करून उपाशीपोटी फिरणारे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परदेशी, नीलेश चव्हाण, परशराम शिंदे, योगेश बोदडे, विशाल वडघुले, निवृत्ती खालकर व इतर सहकाºयांची तळमळ ही अभिनंदनीय असून, आपण सर्वांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. तालुक्याच्या दुष्काळाचा ऊहापोह करताना, तालुक्याला खंबीर नेतृत्व न लाभल्याने तालुक्याची मोठी परवड झाली असल्याचे बोरसे यांनी सांगितले. त्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आलेले असून, जनतेनेसुद्धा सक्रियतेने या आंदोलनात सहभागी व्हावे, अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही, असा इशारा दिला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन देवदत्त सोनवणे यांनी केले. उपसरपंच संदीप बोरसे यांच्या हस्ते समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांचा सत्कार करण्यात आला. तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब बोरसे, दादा बोरसे, कॉ. देवचंद सुरसे, प्रल्हाद काका बोरसे, मोगल गुरुजी, तेजूल बोरसे, गणेश बोरसे, सुरेश बोरसे, मधुकर सूर्यवंशी, प्रशांत बोरसे, माणीक हिरे, जगन सुरसे, राजेंद्र बोरसे, जिजाऊ पवार आदी उपस्थित होते.
‘नार-पार’साठी एकजुटीने संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:34 AM