नाशिकरोड : आयटीआयमध्ये आय.सी.टी.एस.एम. व्यवसायाच्या द्वितीय वर्षाचा थेअरी व गणित विषयांचा पेपर ऐनवेळी आॅनलाइन पद्धतीने व अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारून घेण्यात आल्याने ९५ टक्क्याहून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यामुळे पुन्हा दोन्ही विषयांचे लेखी पेपर घेण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे असा प्रकार संपूर्ण राज्यातील आयटीआयमध्ये झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.सातपूर आयटीआय व सीबीएस येथील महिला आयटीआयमध्ये आय.सी.टी.एस.एम. व्यवसाय दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला होता. द्वितीय वर्ष (फोर्थ सेमिस्टर) ची परीक्षा गेल्या आॅगस्ट महिन्यात घेण्यात आली. यामध्ये चित्रकला विषयाचा ७५ गुणाचा पेपर ‘ओएमआर’ पद्धतीने घेण्यात आला. मात्र ऐन परीक्षेच्या दिवशी थेअरी व गणित विषयाची ओएमआर पद्धतीने होणारी परीक्षा रद्द करून दोन दिवसांनी आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली. दोन्ही विषयांकरिता १५० गुणांचा पेपर होता. आॅनलाइन पद्धतीने थेअरी व गणित विषयाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेत अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारण्यात आले. तर गणिताच्या पेपरमध्ये थेअरीच्या विषयांचे प्रश्न विचारण्यात आले. यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले होते. या परीक्षेचा निकाल ७ नोव्हेंबरला आॅनलाइन जाहीर करण्यात आला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे तो निकाल दोन-तीन दिवसांनी विद्यार्थ्यांना मिळाला. ऐनवेळी आॅनलाइन पद्धतीने व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त थेअरी व गणिताच्या विषयात प्रश्न विचारल्याने सातपूर आयटीआयमधील २३ पैकी २ व सीबीएस महिला आयटीआयमधील १५ पैकी फक्त १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिंडोरी, सिन्नर आयटीआयमध्येदेखील ९५ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. मुळात या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बाहेर नोकरीत कमी मागणी आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमामुळे नोकरी व शिकाऊ कामगार म्हणून नोकरी मिळाली होती ते नापास झाल्याने त्यांनासुद्धा घरी बसण्याची वेळ आली आहे. ऐनवेळी आॅनलाइन पद्धतीने पेपर घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरे जावे लागले असून, त्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नापास झालेले विद्यार्थी थेअरी व गणित विषयाचा पेपर ओएमआर पद्धतीने पुन्हा घेण्यात यावा, अशी मागणी आयटीआयच्या प्राचार्यांकडे करत आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांना तेराशे रुपये भरून पुनर्परीक्षा अर्ज भरण्यास सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी मानसिक व आर्थिक परिस्थितीचा विचार करून नाशिक विभागाच्या उपसंचालक संचालनालय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांनी लक्ष घालावे, अशी मागणी स्वाती पगारे, दर्शना चव्हाण, दिव्या गवई, वैशाली संधानशिव, क्षितिजा जवखेडकर, प्रज्ञा जाधव, भाग्यश्री एळींजे, शुभांगी डुक्की, प्रणाली सोनवणे, तरन्नुम बागवान, वैशाली अहिरे, वैभव वाघ, मोहित कोथमिरे आदी विद्यार्थ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे असा निकाल राज्यातील सर्व आयटीआयमध्ये लागल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
गोंधळाची स्थिती : ९५ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण; पुन्हा परीक्षेची मागणी आयटीआयची ऐनवेळी आॅनलाइन परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:50 AM
आयटीआयमध्ये आय.सी.टी.एस.एम. व्यवसायाच्या द्वितीय वर्षाचा थेअरी व गणित विषयांचा पेपर ऐनवेळी आॅनलाइन पद्धतीने व अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारून घेण्यात आल्याने ९५ टक्क्याहून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत.
ठळक मुद्देपरीक्षा गेल्या आॅगस्ट महिन्यातदोन्ही विषयांकरिता १५० गुणांचा पेपर