मालेगावी ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य
मालेगाव : शहर परिसरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून, महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवून घाण कचरा उचलावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नवीन बसस्थानकापासून दरेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी गटारी तुंबल्या असून, त्यात मोठ्या प्रमाणावर घाण साचली आहे. यामुळे गटारीचे पाणी रसत्यावर आल्याने दुर्गंधी पसरत आहे.
५६ गाव योजनेचा पाणीपुरवठा बंद
मालेगाव : गिरणा धरणातून नांदगावसह ५६ गाव योजनेचा पाणीपुरवठा जिल्हा परिषदेने थकबाकीच्या कारणास्तव खंडित केला असून, या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. निमगावसह तालुक्यातील १८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थ विहिरी व तलावातील पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, काही लोकांना विकतचे पाणी आणावे लागत आहे.
रेशनकार्ड आधारला जोडण्याचे आवाहन
मालेगाव : शहर व तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अन्न, धान्य मिळण्यास पात्र असतानाही केवळ शिधापत्रिका आधार क्रमांकाशी जोडलेला नसल्याने त्यांना धान्य मिळत नसल्याची तक्रार आहे. संबंधितांनी स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाऊन ३१ जानेवारीपर्यंत शिधापत्रिका आधार कार्डला जोडून घ्यावी, असे आवाहन धान्य पुरवठा अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
उड्डाण पुलाच्या कामास गती देण्याची मागणी
मालेगाव : शहरातील नवीन बसस्थानकाजवळ तीन वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामास गती द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेक दिवसांपासून उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. काही व्यावसायिकांनी पुलाखालीच दुकाने थाटली असून, नागरिकांचे ते विसावा केंद्र झाले आहे.