लोकमत न्यज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शैक्षणिक संस्था सुरू करण्याबाबत शासन पातळीवरच अद्याप ठोस निर्णय घेण्याचे टाळले जात असताना नाशिक महापालिकेने मात्र येत्या १५ जूनपासून महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला असून, त्यासाठी येत्या दोन दिवस अगोदरच शालेय कामकाजासाठी शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे फर्मान शाळा मुख्याध्यापकांनी काढल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
नाशिक शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून, शहरातील प्रत्येक विभागातच बाधितरुग्ण सापडू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची दमछाक होवू लागली आहे. अशा परिस्थितीत शहरातील प्रत्येक नागरिकाने कोरोनाची धास्ती घेतलेली असताना महापालिकेच्या शिक्षण मंडळाने मात्र येत्या १५ जूनपासून यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे यापूर्वीच जाहीर करून शिक्षकांनी आॅनलाइन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा अशा सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार अद्यापही शैक्षणिक संस्था सुरू करण्याबाबत चाचपणी करीत असताना महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षकांपुढे पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये झोपडपट्टी व मध्यमवर्गीयांची मुलेच शिक्षण घेतात. त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून या विद्यार्थ्यांच्या पालकांना कोरोनाच्या संकटात रोजगाराला मुकावे लागले आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यासाठी एकतर या विद्यार्थ्यांना टॅब अथवा अॅन्ड्राइड भ्रमणध्वनी घेऊन द्यावे लागेल. सध्याची परिस्थिती पाहता ते कोणत्याही पालकाला शक्य नसले तरी, या संदर्भात काही शिक्षकांशी संवाद साधला असता, त्यांच्यामते एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत ५ ते ७ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडेच अॅन्ड्राइड भ्रमणध्वनी असून, ते कितपत विद्यार्थ्याला वापरण्यास देतील याविषयी साशंकता आहे, शिवाय अॅन्ड्राइड भ्रमणध्वनी असून, उपयोग नाही, त्यासाठी नेट कनेक्शनही महत्त्वाचे आहे. तथापि, महापालिका शिक्षण मंडळाने या साऱ्या गोष्टींचा सारासार विचार केलेला नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.चौकट===सुट्यांमध्येही सेल्फीची सक्तीशासनाने कोरोनामुळे १६ मार्चपासून सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश देऊन प्रत्येकाला घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. नाशिक महापालिकेने आपल्या शाळा तेव्हापासून बंद केल्या, त्यानंतर शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असे असताना २३ मार्च रोजी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधीक्षकांनी सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांना दररोज घरातून आपली सेल्फी पाठविण्याची केलेली सक्ती अद्यापही कायम आहे.