नाशिक : पाचपेक्षा अधिक व्यक्तींना दालनात प्रवेश नाकारण्याचा अट्टहास कायम ठेवणारे जिल्हाधिकारी, तर कोपर्डी येथील अमानुष घटनेप्रती भावना समजून घेण्याचा कार्यकर्त्यांच्या असलेल्या आग्रहामुळे सोमवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच जोरदार हमरी-तुमरी होऊन घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर समजुतीने कार्यकर्त्यांना दालनाबाहेर काढण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन स्वीकारणे भाग पडले. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अमानुष घटनेप्रश्नी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन देण्यासाठी दुपारी तीन वाजता शहर व जिल्हा कॉँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी फक्त पाच व्यक्तींनाच प्रवेश असल्याची जाणीव कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कॉँग्रेस कार्यकर्त्यांना करून दिली. त्यावर प्रत्येक पाच व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कॉँग्रेसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन शिष्टमंडळ दालनात शिरले. त्यानंतर तिसरे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आत शिरत असताना जोरदार रेटारेटी झाली. अनेक कार्यकर्त्यांनी दालनाचा दरवाजा लोटतच आत प्रवेश केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ‘पाचपेक्षा जास्त व्यक्ती आत आल्यामुळे गेट आउट’ अशी शेरेबाजी केली. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. पाच व्यक्तींनीच दालनात प्रवेश करावा असा कोणता नियम आहे, अशी विचारणा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही कोणाचे निवेदन घ्यावे व घेऊ नये, हा माझा अधिकार असल्याची जाणीव त्यांना करून दिल्यामुळे शब्दामागे शब्द वाढत गेला व अखेर समस्त कॉँगे्रसजन जिल्हाधिकाऱ्यांवर तुटून पडले. ‘दादागिरी नही चलेंगी’ अशा घोषणा देण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केल्यामुळे तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांनी प्रश्नाचा भडिमार सुरू ठेवत, संवेदनशील प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांची असंवेदनशीलता कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केल्यावर आणखीच वातावरण तप्त झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा भ्रमणध्वनी ताब्यात घेण्याची सूचना कर्मचाऱ्यांना केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुरू असलेल्या या गोंधळाची माहिती तातडीने पोलीस यंत्रणेला देण्यात आल्यावर पोलीस उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक व पोलिसांचा फौजफाटा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला. अखेर कार्यकर्त्यांची समजूत घालत त्यांना बाहेर काढण्यात आले. (प्रतिनिधी)
निवेदन देण्या-घेण्यावरून गोंधळ
By admin | Published: July 19, 2016 1:14 AM