नाशिक: गेल्या रविवारी शहरातील ४९ केंद्रांवर घेण्यात आलेल्या आरेाग्य सेवक परीक्षेच्या गोंधळाची चर्चा विधानसभेतही झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची मुद्दा उपस्थित करीत विद्यार्थी संख्येपेक्षा आसनव्यवस्था कमी असल्याकडे लक्ष वेधले. दरम्यान, आरेाग्य सेवक परीक्षेतील गोंधळ राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झाल्याने याप्रकरणी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील परीक्षेची माहितीचा अहवाल देखील शासनाला पाठविण्यात आलेला आहे.
आरोग्य विभागातील आरेाग्य सेवक या पदासाठी राज्यात गेल्या रविवारी विविध केंद्रांवर परीक्षा झाली. नाशिक शहरातही ४९ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यातील गंगापूरोडवरील येथील एका परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यानी आक्षेप घेतल्याने परीक्षेला एक तास उशीर झाला होता. विद्यार्थी संख्येपेक्षा आसनव्यवस्था कमी असल्याने विद्यार्थ्याची गैरसोय झाली. यातून परीक्षेला विलंब झाला. शिवाय कोरोना सुरक्षितता नियम केंद्रांवर कुठेही पाळले गेले नसल्याचा आरोप देखील विद्यार्थ्यानी केला. मास्क, सॅनिटायझर गोंधळानंतर उपलब्ध करून देण्यात आल्याचे विद्यार्थ्यानी सांगितले.
सिडकोतील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यानी परीक्षकांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला होता. परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिकेचे पाकीट सील उघडण्यात आल्याने काही विद्यार्थ्यानी आक्षेप नोंदविला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत या गोंधळाची तक्रार नाशिकमधून करण्यात आली होती. जिल्हा शल्य चिकित्सक तसेच आरेाग्य उपसंचालकांनी याप्रकरणाची दखल घेत शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये एकतास उशीर झाल्याचे तसेच एका केंद्रावर प्रश्नपत्रिकेचे सील निघाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.
नाशिकसह राज्यातील अनेक केंद्रांवर आरोग्य सेवक परीक्षेत गोंधळ झाल्याने याच मुद्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला विचारणा केली. त्यामुळे याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाकडून देखील स्वतंत्रपणे चौकशी होण्याची शक्यता आहे.
--इन्फो--
आरोग्य विभागातील २१ संवर्गातील ४७० पदांसाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. सुमारे १९०० उमेदवार नाशिकमधील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार होते. उमेदवार कमी उपस्थित राहाण्याचा अंदाज होता मात्र अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थी आल्याने ऐनवेळी परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. शेवटी परीक्षा केंद्रावरील सभागृहात विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्याची वेळ आली.