नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळामुळे लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याने राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून, येत्या सोमवारी राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत मतदारांची नावे यादीतून गायब होण्याचे, तसेच अन्य मतदान केंद्रात स्थलांतरित झाल्यामागची कारणे शोधण्यात येणार आहेत. मंगळवारी राज्यातील दहा महापालिका व २५ जिल्हा परिषदांसाठी सर्वत्र मतदान घेण्यात आले. त्यासाठी प्रशासकीय जय्यत तयारी करण्यात आली असली तरी, जवळपास दहा ते पंधरा टक्के मतदारांना त्यांची नावेच मतदार यादीत सापडली नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. एकट्या मुंबईत अकरा लाख मतदारांची नावे यादीत नसल्याने त्यांना मतदान न करताच घरी परतावे लागले आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही असाच प्रकार घडला असून, मतदारांना त्यांची नावे अन्य गटात व लगतच्या गावात स्थलांतरित झाल्याचे तर काहींची नावे दुसऱ्याच मतदान केंद्रात आढळली आहेत. अनेक मतदारांना मतदार यादीच्या गोंधळामुळे मतदानापासून वंचित राहून मनस्ताप सहन करावा लागला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात तर थेट प्रभागही बदलण्यात आल्यामुळे अनेकांनी मतदानासाठी घराबाहेर पडण्यासही नकार दिला. वर्षानुवर्षे ज्या मतदान केंद्रावर मतदान केले त्याठिकाणच्या केंद्रावर नाव न सापडल्यामुळे मतदान केंद्र शोधण्यासाठी पायपीटही करावी लागली आहे. या साऱ्या गोष्टींचा मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलविली आहे. या बैठकीत या साऱ्या प्रकाराची चौकशी होण्याची शक्यता आहे.
गोंधळाची आयोगाकडून दखल
By admin | Published: February 22, 2017 11:57 PM