नाशिकरोड : ज्ञान, शक्ती, भक्ती, कर्म यांचा संगम महाबली श्री हनुमानामध्ये झाला आहे, असे प्रतिपादन भुपेंद्रभाई पंड्या यांनी केले. माहेश्वरी सखी सहेली ग्रुपच्या वतीने आयोजित संत श्री तुलसीदासजी रचित ‘हनुमान चालीसा : एक विवेचन’ या कार्यक्रमास आज उत्साहात प्रारंभ झाला. आर्टिलरी सेंटररोड येथील महेश भवनमध्ये आयोजित ‘हनुमान चालिसा : एक विवेचन’ या कार्यक्रमात बोलताना भुपेंद्रभाई पंड्या म्हणाले, महाबली हनुमान याच्या प्रत्येक लीलेमागे गहन अर्थ आहे. बुद्धी, ज्ञान, बल यांचे तेज हनुमान चालीसामधील प्रत्येक चौपाईमध्ये आढळते. आपल्या जीवनाला ते स्पर्श करते म्हणून संत श्री तुलसीदासजी रचित हनुमान चालिसा प्रत्येकाने ऐकावी, वाचावी, असे पंड्या यांनी सांगितले. प्रारंभी महेशनगर येथील श्री हनुमान मंदिरापासून एका बग्गीमध्ये भुपेंद्रभाई पंड्या व श्री हनुमान चालिसा या पोथीची वाजत-गाजत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये कलशधारी महिला सहभागी झाल्या होत्या. महेश भवनमध्ये हनुमान चालिसा : एक विवेचन या कार्यक्रमाचे उद्घाटन माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बूब, अशोक तापडिया, रामेश्वर मालाणी, श्रीनिवास लोया आदिंच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. हनुमान चालिसा पोथीची पूजा प्रमुख यजमान नंदकुमार श्रीकिसन मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राधेश्याम बूब, नंदलाल लाहोटी, सुधीर भट्टड, सुनील बूब, कांतीलाल लाहोटी, अशोक भट्टड, श्रीकिसन सोमाणी, शरद राठी, शंकर औशीकर, त्र्यंबकराव गायकवाड, नंदा मालाणी, शशिकला बूब, अनुराधा कासट, शकुंतला भुतडा, साधना जाजू, अरुणा कलंत्री, ज्योत्स्ना सोमाणी, लता राठी, सुजाता लाहोटी, सुनंदा मालपाणी, जयश्री ओझा, हेमा जाजू, अंजली चांडक, ममता कलंत्री आदि उपस्थित होते. येत्या सोमवारपर्यंत दररोज दुपारी ३.३० ते ६.३० पर्यंत हनुमान चालिसा : एक विवेचन हा कार्यक्रम होणार आहे. (प्रतिनिधी)