लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर/नायगाव : पुणतांबा येथील कोर कमिटीतील काही सदस्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. काही गावांतील शेतकरी अधिकच आक्रमक होऊन घोषणाबाजी करतांना दिसून आले. तालुक्यातील नायगाव येथे संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. तालुक्यात सकाळी काही ठिकाणी दूध संकलन केंदे्र सुरु झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला.सिन्नर तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात शनिवारची सुटी होती, तर बाजार समितीच्या तालुक्यातील उपबाजारात कोणत्याही शेतकऱ्याने शेतमाल विक्रीसाठी आणला नव्हता. सिन्नर शहरात नाशिक वेस भागात भरणारा भाजीबाजार दुपारी तुरळक प्रमाणात भरला होता. मात्र यात शेतमाल विकणारे शेतकरी कमी तर व्यापारीच अधिक दिसून येत होते. खरेदीसाठीही फारसे ग्राहक नव्हते मात्र भाजीपाल्यांचा भाव जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी काही ठिकाणी दूध संकलन झाले. मात्र संपाबाबत द्विधा स्थिती व एकूणच वातावरण विचारात घेता अनेक ठिकाणी रविवारी दूध संकलन केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. नायगाव खोऱ्यातील शेतकरी आक्रमक४नायगाव : नायगाव खोऱ्यातील शेतकरी शनिवारी आक्रमक झाल्याचे दिसून आले. नायगाव त्रिफुलीवर शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करीत जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतमालास हमीभाव देण्याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. शासन शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. नायगाव येथील तीनही दूध संकलन केंद्रे बंद ठेवण्यात आली व भाजीपाला विक्री न करण्याचा निर्णय घेण्यात आला. जोगलटेंभी संगमावरमहादेवाला दुग्धाभिषेक शेतकरी संप मागे घेतला नसल्याचे सांगत जोगलटेंभी येथील शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रे बंद ठेवली. शेतकऱ्यांनी गामस्थांना मोफत दूध वितरण केले, तर काही शेतकऱ्यांनी दारणा-गोदा संगमावरील महादेव मंदिरातील पिंडीहला दुधाने अभिषेक घालत शासनाला सुबुद्धी देण्यासाठी साकडे घातले. संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाच्या हमीभावाची मागणी यावेळी करण्यात आली. शहा येथे शेतकऱ्यांनीदूध रस्त्यावर ओतलेशेतकऱ्यांनी संप मागे घेतला नसल्याचे सांगत शहा येथील शेतकऱ्यांनी दूध संकलन होऊ दिले नाही. दूध वाहतूक करणारी वाहने शहा-वावी रस्त्यावर अडवून शेतकऱ्यांनी दुधाच्या कॅन रस्त्यावर ओतून दिल्या. शेतकऱ्यांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी बाबा गंधाके, दत्तात्रय आदिक, नवनाथ वाघचौरे, गोरख कांदळकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सकाळी संभ्रम, दुपारनंतर आक्रमक
By admin | Published: June 04, 2017 1:11 AM