सातपूर : नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) निवडणुकीत प्रथमच तीन पॅनलमध्ये निवडणूक होत असली तरी एकता नावाच्या दोन पॅनलमुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांचा संभ्रम दूर करता करता उमेदवारांची दमछाक होत आहे. निमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत प्रथमच तीन पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सत्ताधारी एकता पॅनलमध्ये गटबाजी झाल्याने एका एकताचे दोन एकतामध्ये (हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांचे आणि किशोर राठी-आशिष नहार यांचे) असे रूपांतर झाले आहे. तर या दोन एकताच्या विरोधात उद्योग विकास पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे. उद्योग विकास पॅनलदेखील पूर्वीचे एकता पॅनलच होते. म्हणजेच एकता पॅनलची विभागणी तीन पॅनलमध्ये झाली असे म्हटले जात आहे. त्यामुळे तीनही पॅनलचे उमेदवार हे पूर्वी एकताच्या छताखालीच होते. निमा निवडणुकीत एकताचे जे दोन गट (पॅनल) पडले आहेत, त्या दोघांनी आपल्या पॅनलला एकता नाव दिले आहे आणि आमचीच ओरिजिनल एकता असल्याचे दोन्ही पॅनलकडून दावा केला जात आहे. मत मागण्यासाठी प्रचार करीत असताना आमची एकता कोणती आहे याचे स्पष्टीकरण मतदारांना द्यावे लागत आहे. तरीही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.निवडणुकीतील पॅनलच्या नामसाधर्म्यामुळे मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे. तर पॅनलमधील बहुतांश उमेदवारांना मतदार ओळखत नसल्याने पॅनलच्या नेत्यांना उमेदवारांची ओळख करून द्यावी लागत आहे. एकूणच उमेदवारांची मत मागताना चांगलीच दमछाक होत आहे.
एकता पॅनलच्या नामसाधर्म्याने संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:52 PM