नाशिक : कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच बारावीची परीक्षा होत असून, शुक्रवारी (दि. ४) इंग्रजीच्या पेपरने या परीक्षेला सुरुवात झाली. नवीन पॅटर्नप्रमाणे पहिल्यांदाच ही परीक्षा होत असतानाही अस्पष्ट प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा काही प्रमाणात गोंधळ उडाल्याचे दिसून आले. तर काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत अनेक चुका असल्याची तक्रारही परीक्षेनंतर केली.
बारावी अभ्यासक्रमाच्या नवीन पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका तयार करणे अपेक्षित असताना काही प्रश्नांच्या बाबतीत ही खबरदारी घेतली गेली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली असून, प्रश्नपत्रिकेत मुद्रण संशोधनाचेही दोष असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत एका संस्थेच्या प्राचार्यांनी प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्या अनेक चुका असल्याचे सांगितले. तसेच सामान्यज्ञान, पद्य, कादंबरी विषयासंदर्भात अनपेक्षित पद्धतीचे प्रश्न असल्याचे सांगितले. तसेच मुलाखतीसंदर्भातील प्रश्नासंदर्भात अपेक्षित आराखडाही प्रश्नपत्रिकेत देण्यात आला नसल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, एका इंग्रजी भाषा शिक्षकाने प्रश्नपत्रिकेत कोणत्याही गंभीर चुका नसल्याचे स्पष्ट करतानाच काही प्रश्नांच्या बाबतीत अस्पष्टता असल्याचे सांगितले.
--
प्रश्नपत्रिकेवर काय आहेत आक्षेप
व्याकरणात बहुपर्यायी उत्तरे अपेक्षित होती. नवीन पॅटर्नप्रमाणे नाही.
प्रश्न ३ - बी Appreciation of the poem मध्ये - मुद्दे देणे अपेक्षित नव्हते. (नवीन पॅटर्नप्रमाणे विद्यार्थ्यांना ते स्वातंत्र्य दिले होते)
प्रश्न ४ बी - Interview Questions : ह्या प्रश्नात नवीन पद्धतीप्रमाणे एक आराखडा द्यायला हवा होता... ज्यात प्रश्न बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना क्लू मिळतो.
प्रश्न - डी (३) Appeal - ह्या लेखन कौशल्यात विषयच दिला नाही... तर विद्यार्थी काय लिहिणार? तसेच शेवटचा प्रश्नात small हे पात्र आहे की विशेषण? यासह व्याकरणाच्या आणि छपाईच्या चुका असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
--
नवीन पॅटर्नप्रमाणे पहिल्यांदाच परीक्षा
बारावीची परीक्षा नवीन पॅटर्नप्रमाणे पहिल्यांदाच होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही याविषयी अधिक स्पष्टता नव्हती. त्यातच प्रश्नपत्रिकेतील अस्पष्ट प्रश्न आणि चुकांमुळे विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी अडचणींचा सामना करावा लागला.
--
७ मार्चला मंडळाची बैठक
बारावीच्या इंग्रजी पेपरमधील चुका व प्रश्नपत्रिकेविषयी आलेल्या तक्रारींसदर्भात सोमवारी (दि. ७) मार्चला नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यालयात नियामक मंडळाची बैठक होणार आहे. यावेळी पेपर तयार करणाऱ्या शिक्षकांचे मत जाणून घेतल्यानंतर बैठकीनंतरच प्रश्नपत्रिकेत चुका आहेत किंवा नाहीत, हे स्पष्ट होणार असल्याचे एका इंग्रजी भाषा विषय शिक्षकाने सांगितले.