नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाºया शालेय पातळीवरील पायाभूत परीक्षेच्या काही प्रश्नपत्रिका ग्रामीण भागात पोहोचल्याच नसल्याचा प्रकार लक्षात आल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु काही वेळानंतर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्याने परीक्षा सुरळीत पार पडली.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून तालुका आणि मनपा स्तरावरील इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा घेतली जाते. गुरुवारी या परीक्षेला जिल्ह्यात प्रारंभ झाला. शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि त्यानंतर तालुका आणि मनपा शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. परंतु परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये प्रश्नपत्रिका वेळेवर पोहचल्या नसल्याची तक्रार समोर आली. याप्रकरणी जिल्हा परिषदेकडूनदेखील दुजोरा देण्यात आला नसला तरी जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी याप्रकरणी जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्याचे समजते. लासलागाव, निफाड, येवला या ठिकाणी दहा ते पंधरा वीस प्रश्नपत्रिका कमी आढळून आल्या. शेवटी मुख्याध्यापकांनी झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरविल्या. जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु अनेक गठ्ठ्यांमध्ये विद्यार्थी संख्येपेक्षा कमी प्रश्नपत्रिका आढळल्याने मुख्याध्यापकांना धावपळ करावी लागली. सदर परीक्षा शुक्रवारी आणि त्यानंतर सोमवारी होणार असून, पुढील प्रश्नपत्रिका परिपूर्ण पाठविल्या जातील, असे शिक्षण विभागाकडून आश्वासन देण्यात आलेले आहे.
पायाभूत चाचणी परिक्षेत काही ठिकाणी गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:01 AM