नाशिक- महावितरणमध्ये राबवण्यात येत असलेल्या भरती प्रक्रीयेत मराठा समाजाचा एकही पात्र उमेदवार नियुक्तीविना राहणार नाही असे उर्जा मंत्री जाहिर करीत असताना दुसरीकडे एसईबीसीला वगळून नियुक्त्या देण्यात येतील असे पत्रक शासनाच्याच अधिकाऱ्यांनी काढले आहे. त्यामुळे शासनात गोंधळ असल्याचा आरोप विविध मराठा समाजाच्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. मराठा समाजातील पात्र उमेदवारांना संधी दिल्याशिवाय भरती प्रक्रीया राबवू नये अशी मागणीच या संघटनांनी केली आहे.
छावा क्रांतीवीर सेनेचे करण गायकवर, युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग, प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे, नवनाथ शिंदे, उद्योजक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष वंदनाताई कोल्हे अशा विवीध पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
गेल्या वर्षी उपकेंद्र सहायक पदाची भरतीसाठी प्रक्रीया राबवण्यात आली. ही प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर चालू वर्षी ९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले असले तरी यापूर्वीच्या नियुक्तींचे आदेश मात्र कायम राहातील असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र असे असताना एसबीसीई प्रवर्गातून निवड झालेल्यांना उमेदवारांना टाळून या जागा अडवण्यचा काही अधिकाऱ्यांचा डाव आहे. मात्र, तो सहन केला जाणार नाही. यासंदर्भात राज्य शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणी या संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.