पंचवटी : ‘आम्ही पहाटे साडेपाच वाजल्यापासून इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर रांगेत लस घेण्यासाठी उभे होतो. सकाळी नंबर आला त्यावेळी लस नाही, आजचा कोटा संपला, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही आता परत पहाटे येऊन रांगेत उभे राहायचे का? असा प्रश्न करत कोरोना पार्श्वभूमीवर लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर गोंधळ घालून प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. अखेर घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी नागरिकांची समजूत काढल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागले.
बुधवारी शेकडो नागरिकांनी इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर लस घेण्यासाठी भल्या पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. मात्र, रुग्णालयात केवळ दोनशेच्या आसपास डोस आल्याने ही बाब प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली. सकाळी आलेल्या लस नागरिकांना देण्यात आल्या. मात्र, लसीचे डोस २०० आणि नागरिक ५०० अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ज्या नागरिकांना रांगेत उभे राहूनही लस मिळाली नाही, त्यांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी मोठी गर्दी होऊन काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर घटनास्थळी पंचवटी पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने नागरिकांची समजूत काढल्यानंतर नागरिक माघारी फिरले.
बॉक्स==
ढिसाळ नियोजन
मी सकाळी सहा वाजल्यापासून रुग्णालयाबाहेर लस घेण्यासाठी उभा होतो. मात्र, माझा नंबर येणार तोच ‘लसीचा कोटा संपला, तुम्ही नंतर या’, असे सांगण्यात आले. हे आम्हाला अगोदर सांगितले असते तर दोन तास रांगेत कशाला उभे राहिलो असतो? प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे.
- सोमनाथ चौधरी
इन्फो==
नागरिकांचा रोष वाढला
महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दररोज शेकडो नागरिक लसीकरणासाठी येतात. लसीचे जेवढे डोस उपलब्ध होतील, त्यानुसार नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र, लस कमी आणि नागरिक जास्त अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. लस पुरवठा सुरळीत झाला तर लसीकरणही सुरळीत सुरु राहील.
- विवेक धांडे, विभागीय अधिकारी, पंचवटी मनपा