नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा घोळ कायम असून अपुऱ्या लसींच्या डोस मुळे शहरात आजही गोंधळ सुरु होता. पंचवटी कारंजा येथील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर पहाटे पासून उभ्या असलेल्या नागरिकांना लस मिळाली नसल्याने गोंधळ झाला. अखेरीस पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
आम्ही पहाटे साडे पाच वाजल्यापासून इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर रांगेत लस घेण्यासाठी उभे होतो. सकाळी नंबरआला त्यावेळी लस नाही, आजचा कोठा संपला असे स्पष्ट करण्यात आले. आम्ही आता परत पहाटे येऊन रांगेत उभे राहायचे का’ असा सवाल करत कोरोना पार्श्वभूमीवर लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त करीत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर गोंधळ घालून प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. अखेर घटनास्थळी पोलिस दाखल झाले त्यांनी नागरिकांची समजूत काढल्यावर माघारी फिरावे लागले.
महापालिकेने आज केवळ ४५ वर्षावरील लसीकरणाचे नियोजन केल्यानंतरही दिवशी शेकडो नागरिकांनी इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर लस घेण्यासाठी भल्या पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. मात्र रुग्णालयात केवळ दोनशेच्या आसपास डोस आल्याने प्रशासनाची डोकेदुखी ठरली. सकाळी आलेल्या लस नागरिकांना देण्यात आल्या. मात्र लस डोस २०० आणि नागरिक ५०० अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ज्या नागरिकांना रांगेत उभे राहून लस मिळाली नाही त्यांनी मोठा गोंधळ घातला. त्यावेळी मोठी गर्दी निर्माण होऊन काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर घटनास्थळी पंचवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाने नागरिकांची समजूत काढल्यानंतर नागरिक माघारी फिरले.