नाशिक : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अघोषित कांदा निर्यातबंदी तातडीने रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी कॉँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जगभरात लॉकडाऊन असताना शेतीत खपून मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतक-याला होती, पण केंद्रातील मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी करून केंद्र सरकारच्या या निणर्याविरोधात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, अश्विनी बोरस्ते, राहुल दिवे, रईस शेख, वत्सलाताई खैरे, स्वप्निल पाटील, अनिल कोठुळे, सुरेश मारू आदी उपस्थित होते. दरम्यान, नाशिकच्या द्वारकासमोरील कांदा बटाटा भवन येथे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्यावतीने निषेध आंदोलन केले.
कांदा निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 2:15 PM