नाशिक : छगन भुजबळांवर अन्याय म्हणजे नाशिकच्या विकासावर अन्याय होत असल्याचा सूर हॉटेल एसएसके येथे झालेल्या ‘अन्याय पे चर्चा’ या बैठकीत उमटला. यावेळी कॉँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही ‘भुजबळ समर्थक जोडो’ अभियानात सक्रिय सहभागी होण्याची ग्वाही दिली. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात लाखो समर्थकांचा मोर्चा मुंबई येथे काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या चर्चेप्रसंगी बोलताना पश्चिम विभागाच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितले, नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी छगन भुजबळ यांचे योगदान मोठे आहे. भुजबळ नसल्यामुळे नाशिक जिल्ह्याचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. त्यांनी केलेला विकास विरोधकही मान्य करतात. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता झाली असून, भुजबळ समर्थक जोडो अभियानाला आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी मंत्री शोभा बच्छाव म्हणाल्या, छगन भुजबळ यांना डांबून ठेवण्यात आले असतानादेखील भुजबळ यांचे जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचा सतत पत्र व्यवहार सुरू असून, त्यांनी अधिवेशनात सर्वांत जास्त तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ होणाºया आंदोलनास आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी सांगितले, छगन भुजबळांमध्ये विविध मुद्द्यांवर मोठ्या नेत्यांशी लढण्याची ताकद आहे. त्यामुळे त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्यावर सूड बुद्धीने कारवाई सुरू असून, त्यासाठी सर्व समर्थकांनी एकत्र येऊन लढा उभा करावा तसेच मुंबई येथे मोठे आंदोलन उभे करावे, असे शैलेश कुटे यांनी सांगितले. यावेळी आमदार जयवंतराव जाधव, रवींद्र पगार, गजानन शेलार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा केली. याप्रसंगी, नगरसेवक गजानन शेलार, विमलताई पाटील, हेमलता पाटील, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नानासाहेब महाले, मधुकर जेजूरकर, लक्ष्मण जायभावे, गोकुळ पिंगळे, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब कर्डक, योगेश कमोद, अंबादास खैरे, मुख्तार शेख, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, कविता कर्डक आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूडबुद्धीने कारवाई छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप वक्त्यांनी बोलताना केला. भुजबळ यांना जामीन मिळू नये, यासाठीही सरकार खोडा घालत असून, सरकारच्या या सूडबुद्धीविरोधी एकत्रित येण्याचे आवाहन वक्त्यांनी केले. समन्वय समितीची बैठक छगन भुजबळ यांच्यावर होणाºया अन्यायाच्या निषेधार्थ शहरातील प्रत्येक प्रभागात तसेच ग्रामीण भागात गल्ली गल्ली ‘अन्याय पे चर्चा’ करून भुजबळ समर्थक जोडो अभियान यशस्वी करण्याचा निर्धार समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला. शहरातील सर्व प्रभागातील समन्वयक तसेच जिल्हा पातळीवर प्रत्येक तालुक्यात समन्वयकांच्या नेमणुका करण्यात आल्या. यावेळी सहा विभागात प्रत्येकी १० कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात आली. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात प्रत्येकी २० बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
‘भुजबळ समर्थक जोडो’ अभियानात कॉँग्रेसही सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 1:19 AM