कळवण : येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून माजी आमदार अॅड काशिनाथ बहीरम यांचे सुपूत्र मयुर बहीरम व भाजपकडून नगरसेविका सौ सुरेखा जगताप या दोघांमध्ये लढत होत असून काँग्रेसच्या रोहीणी महाले यांनी मंगळवारी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस व भाजप यांच्यात आमने सामने दुरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने काँग्रेसच्या मयुर बहीरम यांच्या नावाला हिरवा कंदील दिला असून भाजपकडे बहुमत नसतांनौ सुरेखा जगताप या नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जात असल्याने चमत्कार होतो की काय याकडे कळवणकरांचे लक्ष लागले आहे. कळवण नगरपंचायतच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ बुधवारी (दि.३०) संपत आहे. या पाशर््वभूमीवर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी निवडणुक कार्यक्र म जिल्हाधिकारी कार्यालयाने घोषित केला आहे. नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी निवडणुक होणार आहे. उपनगराध्यक्षपदाचे नामनिर्देशनपत्र बुधवारी स्वीकारले जाऊन त्यानंतर निवडणुक प्रक्रि या पूर्ण केली जाणार आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत आहे. मात्र अनुसूचित जमातीचा सदस्य नसल्याने नगराध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले. काँग्रेस व भाजपला संधी चालून आली असल्याने दोघांनी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी निवडणुक होणार असल्याने संधी कुणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे. १७ सदस्य असलेल्या कळवण नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस , कॉग्रेस , भाजप व शिवसेना अशी आघाडी असून आघाडीचे १४ सदस्य तर भाजपचे ३ सदस्य आहेत. कळवण नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्षपदाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता पगार यांना मिळाला होता. द्वितीय नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व गटनेते कौतिक पगार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा कौल काँग्रेसचे नगरसेवक मयुर बहीरम यांच्या बाजूने दिला असल्याने कॉग्रेसच्या मयुर बहीरम यांच्या नगराध्यक्षपदावर आज शिक्कामोर्तब होईल मात्र नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा झेंडा रहाणार आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय समीकरणामध्ये बदल होणार असल्याचे संकेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनी दिले असून कळवण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसला संधी दिल्याचे हिरे यांनी सांगितले.
कळवणला कॉँग्रेस, भाजपा आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:09 AM