नाशकातील ड्रग्ज माफीयाच्या संबंधावरून काँग्रेस-भाजप जुंपली
By संजय पाठक | Published: October 10, 2023 02:47 PM2023-10-10T14:47:12+5:302023-10-10T14:48:25+5:30
नाना पटोले यांच्या आरोपामुळे खळबळ; आमदार फरांदे म्हणतात नाव जाहिर करा
संजय पाठक
नाशिक- ड्रग्जमाफीया ललीत पाटील हा नाशिकमध्ये एम डी पावडरचा कारखाना चालवत होता. तो उध्दस्त करतानाच नाशिकमध्ये काही स्थानिक ड्रग
विक्रेत्यांनाही पकडले आहे. मात्र, काही स्थानिक आमदार या ड्रग माफीयांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप कॉंंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना
पटोले यांनी केला आहे. त्यावर राजकारण रंगले असून भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पटोले यांना संंबंधीतांची नावे जाहिर करावी असे आव्हान दिले आहे.
नाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून युवकांमध्ये नशेचे प्रमाण वाढते आहे. त्यातच राज्यातील प्रमुख ड्रग्ज माफीया ललीत पाटील याचा भाऊ भूषण
पाटील नाशिकमध्ये शिंदे गावाच्या परीसरात एमडी पावडर तयार करीत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर साकीनाका पोलीसांनी नाशिकमध्ये येऊन हा कारखाना उध्दस्त केला. याच दरम्यान नाशिकच्या वडाळा भागातून एका महिलेसह दोन जणांना ड्रग विक्री प्रकरणी अटक केली. यासंदर्भात साेमवारी नाशिकमध्ये आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक ड्रग माफीयांना वाचवण्यात काही स्थानिक आमदारांचा हात असल्याचा आरोप केला. त्यावरून राजकारण रंगले असून भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पटोले यांनी त्या आमदारांची नावे जाहिर करावी तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार पुरावे असतील तर तेही विधी मंडळात मांडावे असे खुले आव्हान दिले आहे.