लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपचा केवळ काँग्रेसच मुकाबला करू शकते. इतर पक्ष करू शकत नाहीत, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.येथील अमन चौकात मनपा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारसभेत चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेस शहराध्यक्ष माजी आमदार शेख रशीद होते.व्यासपीठावर आमदार आसीफ शेख, डॉ. शोभा बच्छाव, हेमलता पाटील, डॉ. तुषार शेवाळे, लकी हसन, शरद आहेर, डॉ. राजेंद्र ठाकरे, साबीर गोहर, गाझी अमानुल्ला आदि उपस्थित होते.अशोक चव्हाण म्हणाले, शहराने काँग्रेसला मजबुतीने साथ दिली ही खूप मोठी निवडणूक आहे असे मी मानत नाही; परंतु एक आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. सर्वात जास्त पेट्रोल महाराष्ट्रात महाग आहे, असे सांगून चव्हाण म्हणाले, दुष्काळात शेतकऱ्यांना काय मिळाले? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत राहिल्या.हे सरकार नसून सावकार आहे. गरीबांना लुटण्याचे काम या सरकारने केले आहे. आज यंत्रमाग व्यवसायाची स्थिती अत्यंत खराब झाली आहे की कापड बाहेरून येत आहे. संसदेत हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. युपीए सरकारने यंत्रमाग व्यवसायास नेहमी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. यंत्रमाग व्यवसायाची अवस्था बिकट असून यंत्रमाग व्यवसाय धोक्यात आला आहे. देशाची इतकी बिकट अवस्था आम्ही पाहिली नव्हती.महाराष्ट्रात एमआयएम म्हणजे बीजेपीची ‘बी’ पार्टी आहे. भाजपला फायदा करण्यासाठी एमआयएम महाराष्ट्रात आला असून लोकांनी त्यापासून सावध रहावे. भाजपच्या लढाईसाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी मुख्यमंत्री असताना मालेगावकरांनी जे मागितले ते आम्ही दिले. मेहनत करणारे नेते येथे आहेत. त्यामुळे तुम्हाला इतरांकडे जाण्याची आवश्यकता काय? असे त्यांनी शेवटी सांगितले. उद्या रविवारी टेन्शन चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रचारसभा होणार आहे.भाजपाचा लोकांशी संवादच राहिला नाहीच्भाजप आता ‘संवादयात्रा’ काढणार आहे. कारण त्यांचा लोकांशी संवादच राहिलेला नाही. जनता सरकारला खाली बसविण्याचे काम करेल. त्याची सुरूवात मालेगावातून होईल. जो शेतकऱ्याला ‘साला’ म्हणतो तो रावसाहेब दानवे शेतकऱ्यांशी ‘संवाद’ साधणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
भाजपाशी मुकाबला कॉँग्रेसच करू शकते
By admin | Published: May 21, 2017 12:45 AM