नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. याविरोधात मराठा समाजाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनेच १६ टक्के आरक्षण दिले होते, असा प्रचार केला जातो. मात्र, यात तथ्य नाही. काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, परंतु, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव पत्करावा लागल्याने तत्क ाळ राणे समिती नेमून काँग्रेसने आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही. मात्र भाजपा सरकारने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करून मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने आरक्षण मिळवून दिल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी देत राज्य सरकारला सामाजिक व आर्थिक परिस्थितीच्या आधारे आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मराठा आरक्षणावरून आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीला शनिवारी (दि. २९) नाशिकमध्ये सुरुवात झाली. या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होेते. व्यासपीठावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, प्रदेशाध्यक्ष अॅड. माधवी नाईक, प्रदेश प्रभारी उमा खापरे, पूजा मिश्रा, भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे उपस्थित होते. रावसाहेब दानवे म्हणाले, राज्यातील भाजपा सरकारने मराठा आक्षणाविषयी सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मंजूर करून घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयानेही त्याला मंजुरी दिल्याचे सांगतानाच महिलांना विधानसभेत व लोकसभेतही ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासोबतच नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्वृत्वातील राज्य सरकार लोकांसाठी आणलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लोकांपर्यंत शासकीय योजना पोहचत नसतील तर त्यास सरकार नव्हे तर त्या पक्षाचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले, तर भाजपाच्या महिला मोर्चाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली असून, आगामी दिवसात रक्षाबंधन आणि सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले.
भाजपा महिला मोर्चाचे ‘रक्षाबंधन’ केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचे बहूमताचे सरकार स्थापन झाले आहे. त्याचपार्श्वभूमीवर राज्यातही पुन्हा भाजपाला यश मिळवून देण्यासाठी राज्यात भाजपाच्या महिला मोर्चाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रक्षाबंधन’उपक्रम राबवून त्या माध्यमातून पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठी मोहीम आकली आहे. त्यामाध्यमातून महिला मोर्चाच्या पदाधिकाºयांना राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी मागदर्शन करीत अधिकाधिक महिलांशी संपर्कसाधून सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे आवान केले.