नाशिक : काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, असा आरोप करत २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव पत्करावा लागल्याने कॉँग्रेस आणि राष्टवादीच्या सरकारने राणे समिती नेमून काँग्रेसने आरक्षणाची घोषणा केली. मात्र हे आरक्षण मात्र भाजपा सरकारने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करून मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने आरक्षण मिळवून दिल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोनदिवसीय बैठकीला शनिवारी (दि. २९) नाशिकमध्ये सुरुवात झाली. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होेते. व्यासपीठावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेशाध्यक्ष अॅड. माधवी नाईक, प्रदेश प्रभारी उमा खापरे, पूजा मिश्रा, भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे , महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा निशिगंधा मोगल. डॉ. कांता नालावडे, मोहिनी पत्की आदी उपस्थित होते. रावसाहेब दानवे म्हणाले, राज्यातील भाजपा सरकारने मराठा आक्षणाविषयी सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मंजूर करून घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयानेही त्याला मंजुरी दिल्याचे सांगतानाच महिलांना विधानसभेत व लोकसभेतही ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासोबतच नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्वृत्वाखालील राज्य सरकार लोकांसाठी आणलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचत नसतील तर त्यास सरकार नव्हे, तर त्या पक्षाचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणूक भाजपा आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून लढविण्याची तयारी करीत असताना दानवे यांनी सर्व २८८ जागांवर तयारी करण्याच्या सूचनेची पुनरावृत्ती केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्यानंतर युतीचा उल्लेख केल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात निर्माण झालेली साशंकता संपुष्टात आली.भाजपा महिला मोर्चाचे ‘रक्षाबंधन’केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातही पुन्हा भाजपाला यश मिळवून देण्यासाठी राज्यात भाजपाच्या महिला मोर्चाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रक्षाबंधन’ उपक्रम राबवून त्या माध्यमातून पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठी मोहीम आखली आहे. त्या माध्यमातून महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मार्गदर्शन करीत अधिकाधिक महिलांशी संपर्क साधून सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.काँग्रेसला राष्ट्रीय अध्यक्ष मिळेनाभारतीय जनता पार्टीने दोन खासदारांपासून ते ३०३ खासदार निवडून आणण्याचा पल्ला गाठला आहे. मात्र जेव्हा भाजपाचे दोन खासदार होते तेव्हा, काँग्रेसकडून भाजपाची खिल्ली उडविली जात होती. मात्र आज तीच परिस्थिती काँग्रेसवर आली असून, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारण्यासही कोणीही पुढे येत नसल्याची स्थिती निर्माण झाल्याची टीका दानवे यांनी केली. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसने देशात कोणत्याही पक्षाचे स्थिर सरकार येऊ दिले नाही. त्यातून काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नसल्याचे चित्र निर्माण केले. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वास संपादन केला, त्यामुळेच जनतेने काँग्रेसला नाकारल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेसला आरक्षण द्यायचेच नव्हते : रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 1:13 AM