नाशिक : राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी दोन्ही पक्षांनी त्यांच्या पातळीवर जिल्हा परिषदेच्या सर्व ७३ गट व १४६ गणांसाठी उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे. दुसरीकडे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांचे बंधू भास्करराव पानगव्हाणे यांनी कॉँग्रेसकडूनच उगाव गटातून निवडणूक लढविण्याची तयारी केल्याने जिल्हाध्यक्षांना बंधूसाठीच गटात प्रचाराला अडकावे लागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांच्या निवडणुकीत सर्वाधिक गटांची संख्या असलेल्या निफाडसारख्या सधन तालुक्यातही जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या होणार आहेत. त्यातच उगाव या पूर्वाश्रमीचा निफाड गटातून कॉँग्रेसकडून कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांचे धाकटे बंधू भास्करराव पानगव्हाणे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, त्यानुसार पक्षाची मुलाखत देत प्रचारही सुरू केल्याची चर्चा आहे. अर्थात हा गट जिल्ह्णातील रोमांचक लढतींमधील एक गट आहे. याच गटातून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून विद्यमान अध्यक्ष विजयश्री चुंबळे तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, भाजपाकडून ज्येष्ठ नेते वैकुंठ पाटील किंवा बबन सानप, शिवसेनेकडून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपा, सेना व राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार असल्याने राजाराम पानगव्हाणे यांच्यासाठी बंधू भास्करराव पानगव्हाणे यांची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे निवडणूक काळात ते जास्तीत जास्त वेळ उगाव गटात देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झालेच तर कॉँग्रेसला अन्य ७२ गटांच्या नियोजनासाठी धावपळ करावी लागल्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष अडकणार ‘बंधू’ प्रचारात
By admin | Published: January 22, 2017 12:36 AM