कॉँग्रेसला २००९च्या निवडणुकीचा फॉर्म्युला नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 01:35 AM2019-09-15T01:35:45+5:302019-09-15T01:37:55+5:30
गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसबरोबर मैत्रीपूर्ण लढत देणाऱ्या कॉँग्रेसने यंदाची निवडणूक आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यासाठी होणाºया जागावाटपाचा सन २००९चा फॉर्म्युला नको आहे.
नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसबरोबर मैत्रीपूर्ण लढत देणाऱ्या कॉँग्रेसने यंदाची निवडणूक आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यासाठी होणाºया जागावाटपाचा सन २००९चा फॉर्म्युला नको आहे. नाशिक जिल्हा कॉँग्रेसने गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत जागावाटपात कॉँग्रेसला देण्यात येणाºया पाच जागांव्यतिरिक्त आणखी दोन जागा अतिरिक्त मिळाव्यात, असा आग्रह धरला आहे. राज्यात दोन्ही कॉँग्रेसमध्ये समसमान जागा लढविण्याचे ठरत असताना त्यात नाशिकच्या अतिरिक्त जागांच्या मागणीमुळे खोडा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीशी आघाडी न झाल्याने कॉँग्रेसने पंधराही जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी मालेगाव व इगतपुरी या दोन जागांवर पक्षाचे उमेदवार निवडून आले. अन्य मतदारसंघात कॉँग्रेस तिसºया व चौथ्या क्रमांकावर राहिली. असाच प्रकार २००९च्या निवडणुकीत झाला होता. कॉँग्रेस व राष्टÑवादीची आघाडी झाली असता, कॉँग्रेसला पाच जागा सोडण्यात आल्या होत्या; परंतु सिन्नर व इगतपुरी या दोन जागांवरच कॉँग्रेस विजयी होऊ शकली. अन्य तीन जागांवर पराभव पत्करावा लागला होता. आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच, प्रारंभीच्या काळात कॉँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांनी पक्षाने स्वबळावर लढावे, असा सूर लावला होता; परंतु राष्टÑवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी जाहीर केल्यानंतर स्थानिक पुढाºयांचे आवाज बंद झाले असले तरी, राष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर त्यांनी दावा सांगून एकप्रकारे दबावाचे राजकारण सुरू केले आहे. मध्यंतरी पक्षाच्या निवडणूक समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांची राजकीय परिस्थिती व इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली असता, पंधरा जागांसाठी ४४ इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली. त्यात इगतपुरी व मालेगाव या दोन्ही विद्यमान आमदारांचाही समावेश होता. तथापि, काही दिवसांपूर्वीच कॉँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदाराने शिवबंधन बांधल्यामुळे आता जिल्ह्यात कॉँग्रेसचा एकमेव आमदार शिल्लक राहिला
आहे. अशा परिस्थितीत कॉँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत पार्लमेंटरी बोर्डाच्या झालेल्या बैठकीत मालेगाव, चांदवड, इगतपुरी, नाशिक पूर्व व नाशिक मध्य या पाच मतदारसंघांची मागणी करतानाच बागलाण व दिंडोरी या दोन विधानसभा मतदारसंघांची वाढीव मागणी केली आहे.
जिल्ह्यातील पंधरा जागांचे राष्ट्रवादीसोबत वाटप करताना कॉँग्रेसला निम्म्या म्हणजे सात ते आठ जागा मिळाव्यात, असा आग्रह कायम ठेवून मालेगाव बाह्ण या विधानसभा मतदारसंघाचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविला आहे. पक्षाच्या नेत्यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघ पक्षाकडे ठेवल्यास तो लढविण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी दर्शविली आहे.
आठवडाभरात निर्णयाची शक्यता
येत्या आठवडाभरात दोन्ही कॉँग्रेसची जागावाटपाविषयी बोलणी होणार असून, त्यात नाशिकच्या जागावाटपाबाबत निर्णय होईल; मात्र कॉँग्रेसने राष्टÑवादीच्या ताब्यातील दोन मतदारसंघांवर दावा सांगितल्यामुळे राष्टÑवादी ते मान्य करेल काय? तसे झाल्यास राष्टÑवादीकडून कॉँग्रेसच्या ताब्यातील इगतपुरी व नाशिक मध्य मतदारसंघावर दावा सांगितला जाण्याची शक्यता अधिक आहे.