नाशिक : बिहारमध्ये आघाडीच्या घटक पक्षांचे अन्य उमेदवार निवडून आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे वक्तृत्वाचे कौशल्य असलेला कन्हैया कुमार आणि महाराष्ट्रात लाखोंच्या सभा घेणारे राज ठाकरे यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील मोठा पक्ष म्हणून ठोस भूमिकी घेतली नाही. अशाप्रकारे मोठ्या भावाची भूमिका बजावण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याने लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्याचे विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी नोंदवले आहे.गोदाघाटावरील यशवंत महाराज देवमामलेदार पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेत २७ वे पुष्प त्यांनी गुफले. निर्मला केशव गरुड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवारी (दि. २७) ‘लोकसभा निवडणूक-२०१९ निकालाचा अन्वयार्थ’ विषयावर व्याख्यान देताना त्यांनी देशात सतराव्या लोकसभा निवडणुकीदरम्यान घडलेल्या विविध राजकीय घडामोडींचा उलगडा नाशिककरांसमोर केला. ते म्हणाले, एकीकडे काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर आघाडीच्या घटक पक्षांची एकत्रित मोट बांधण्यात अपयश आले असताना दुसरीकडे एनडीएच्या घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुक ीला सामोरे जाण्यात मोदींना यश आले. शिवाय मोदींना ऐन निवडणुकीच्या काळात विकासकामे आणि सरकारच्या योजनांच्या विषयांना बगल देत राष्ट्रभक्ती, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक असे मुद्दे उपस्थित करून मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात यश आल्याचे सुरेश भटेवरा यांनी सांगितले. यावेळी विवेक गरुड, विजय गरुड, साहिल गरुड आदी उपस्थित होते.
मोठ्या भावाच्या भूमिकेत काँग्रेस अपयशी : सुरेश भटेवरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:49 AM