गणेश धुरी : नाशिकनिसर्गनियमाप्रमाणे ‘जे पेरले ते उगवते’ याची प्रचिती राजकारणातही अधूनमधून येत असते. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉँगे्रसने ऐनवेळी केलेला कॉँग्रेसचा‘घात’ कायमच उराशी बाळगून अडीच वर्षांनंतर अध्यक्षपदाचा राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेला अध्यक्षपदाचा ‘घास’ कॉँग्रेसने शिवसेनेशी घरोबा करीत हिरावला. (कै.) पांडुरंग राऊत यांच्यानंतर जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसऱ्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला. तब्बल दोन दशकांनंतर फडकलेल्या शिवसेनेच्या या भगव्याने जसा केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाला दणका दिला तसाच तो २० वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला पायउतार करीत दिला. शिवसेनेच्या या यशामागे अनेक हात रात्रंदिवस राबले आणि त्याची परिणती अशक्यप्राय विजयाने झाली. मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर राज्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकप्रकारे जोश संचारला होता. तोेच जोश कायम राखत मातोश्रीनेही मग राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये जिथे जिथे शक्य असेल तेथे भाजपाला दूर सारून सत्तारूढ होण्याचे स्पष्ट आदेश सेनेच्या मावळ्यांना दिले. त्यातूनच शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने भाजपा व राष्ट्रवादीच्या आधी कॉँग्रेस व माकपाला सोबत घेत जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला. हा निर्धार सभागृहात अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत टिकवून ठेवत विजयाला गवसणी घातली. भाजपा-राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेले माकपा व अपक्षांना गोंजरण्याचे प्रयत्न अपुरे पडले. माकपाच्या तीन पैकी दोन सदस्यांनी केलेले मतदान आणि खुद्द माकपा गटनेते रमेश बरफ यांनी स्वीकारलेली ‘तटस्थता’ अनेक शंकांना आमंत्रण देणारी ठरली. यात कॉँग्रेसनेही आपला ‘हात’ साफ करून घषतला. भाजपा-सेनेची ‘युती’ होणे शक्य नसल्याचे पाहून कॉँग्रेसने चक्क शिवसेनेशी जुळवून घेत राष्ट्रवादीला चपराक लगावली. या निवडणुकीने राजकारणात काहीही घडू शकते, या अनिश्चिततेवर जसे शिक्कामोर्तब केले तसेच ते राजकारणात हिशेब चुकते करण्याची प्रत्येकाला ‘संधी’ मिळते, या विचारालाही बळकटी दिली. केंद्रात आणि राज्यात मोेदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपाला शिवसेनेने नाशिक पुरता का होईना, ‘एक ही मारा’ म्हणत धोबीपछाड देत ३५ संख्याबळ होऊनही विरोधात बसविण्याची किमया साधली.
कॉँग्रेस का हाथ, शिवसेना के साथ!
By admin | Published: March 22, 2017 2:01 AM