करवाढीविरोधात कॉँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:28 AM2018-02-24T01:28:57+5:302018-02-24T01:28:57+5:30
महापालिकेने भाडे मूल्यावर आधारित मिळकत करामध्ये केलेल्या दरवाढीविरोधात शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदर करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात येऊन सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यात आला.
नाशिक : महापालिकेने भाडे मूल्यावर आधारित मिळकत करामध्ये केलेल्या दरवाढीविरोधात शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदर करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात येऊन सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यात आला. महापालिकेने घरपट्टी दरात ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत वाढ केलेली आहे. या करवाढीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद अहेर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयासमोर धरणे धरण्यात आली. यावेळी अहेर यांनी सांगितले, महापालिकेने करवाढीचा बोजा लादला असला तरी यात सरकारी कर समाविष्ट झाल्यानंतर प्रत्यक्षात प्रत्येक मालमत्तेच्या करात दुपटीने वाढ होणार आहे. त्यामुळे, सामान्यांबरोबरच व्यावसायिक उद्योजकांचे कंबरडे मोडणार आहे. सदरची वाढ जनतेवर अन्याय करणारी आहे. अगोदरच नोटबंदी आणि जीएसटीच्या अपरिपक्व निर्णयामुळे जनता त्रस्त असून, त्यात हा करवाढीचा बोजा पडणार आहे. सदर करवाढ रद्द करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, वत्सला खैरे, वसंत ठाकूर, आशा तडवी, हनिफ बशीर, लक्ष्मण जायभावे,उद्धव पवार, बबलू खैरे, प्रतिभा भदाणे, सुमन बागुल, संगीता बिरारी आदी सहभागी झाले होते.
आयुक्तांना निवेदन
कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सदर घरपट्टी दरवाढ अन्यायकारक असून, ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, आयुक्तांनी नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथील शहरापेक्षा नाशिकचे दर खूपच कमी असल्याचे सांगत दरवाढीचे समर्थन केले.