लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीत युतीविरुद्ध एकास एक लढत देण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र करून निर्माण झालेल्या कॉँग्रेस आघाडीने निवडणुकीत एकत्र प्रचार करण्याचे ठरविलेले असताना प्रत्यक्षात मात्र राज्यात कोठेही दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त प्रचार सभा होवू शकलेली नाही. कॉँग्रेसचे राज्यातील नेते स्वत:च आपल्या मतदारसंघात प्रचारात अडकून पडल्यामुळे ते राज्यात प्रचाराला बाहेर पडू शकले नाहीत, परिणामी राष्टÑवादीलाही स्वतंत्रपणे प्रचार करावा लागला.
काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने समविचारी पक्षांना एकत्र घेत या निवडणुकीत आघाडी केली असून, आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबरोबरच काही मतदारसंघात संयुक्त प्रचार सभा घेण्याचेही ठरविण्यात आले होते. नाशिक दौऱ्यावर आलेले राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील तसे संकेत दिले होते. निवडणुकीचे जागावाटप झाल्यानंतर राज्यातील सहा विभागात कॉँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी अथवा सोनिया गांधी यांच्यासमवेत राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त सभा घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे पवार यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात जागावाटप व त्यानंतर उमेदवार निश्चितीत दोन्ही कॉँग्रेसमध्ये अखेरपर्यंत घोळ सुरू राहिला त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांकडे अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याने त्यांना नेत्यांच्या प्रचार सभांमध्ये अडकवून ठेवणे योग्य नसल्याचा मत प्रवाह पुढे आला. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी मात्र उमेदवार जाहीर झाल्यानंतर तत्काळ राज्यव्यापी दौ-याला सुरुवात करून राज्य पिंजून काढण्यास सुरुवात केली. पक्षाचे अन्य नेत्यांनीही आपापल्या व लगतच्या जिल्ह्यात प्रचारसभा घेऊन वातावरण तापविले. कॉँग्रेसचे नेते मात्र आपापल्या मतदार संघात अडकून पडले. पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमध्ये व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये उमेदवारी करीत असल्याने त्यांना सत्ताधारी पक्षांनी अकडवून ठेवले. कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ऐन निवडणुकीत बॅँकॉकला गेले व तेथून परतल्यावर त्यांनी हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्राधान्य देऊन महाराष्टÑात एकमेव सभा घेतली. परिणामी कॉँग्रेसचे राज्यातील उमेदवार आपापल्या बळावरच निवडणुकीला सामोरे जात आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपुष्टात येत असताना आदल्या दिवसांपर्यंत संयुक्त प्रचारसभेचे कोणतेही नियोजन नव्हते. राष्टÑवादीचे शरद पवार हे शुक्रवारी सातारा दौ-यावर होते व तेथून ते पुणे जिल्ह्यात जाणार असल्याचे सांगण्यात आले.