मालेगाव : सणासुदीच्या काळात शहरात होत असलेल्या सततच्या भारनियमनाच्या निषेधार्थ व २४ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, भारनियमन तातडीने रद्द करावे या मागणीसाठी शहर कॉँग्रेस कमिटीच्या पदाधिकाºयांनी वीज वितरण कंपनीच्या येथील मोतीभवन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तब्बल चार तास धरणे व उपोषण आंदोलन छेडले होते.महिलांनी प्रवेशद्वारावरच चूल मांडत स्वयंपाक करून वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी कंपनीचे कार्यकारी अभियंता एस. सी. राठोड यांनी येत्या मंगळवारपर्यंत वीज भारनियमनासंदर्भात निर्णय घेऊ तसेच यंत्रमाग व्यवसायास त्यांच्या शिफ्टनुसार वीजपुरवठा सुरळीत करू असे लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. शहरात गेल्या आठवड्यापासून सायंकाळच्या सुमारास वीज वितरण कंपनीकडून सक्तीचे भारनियमन केले जात आहे. यामुळे यंत्रमाग व्यवसायासह लघुउद्योग कोलमडून पडले आहेत. नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. अंधारामुळे भुरट्या चोºयांचे प्रमाण वाढले आहे. या भारनियमनाच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली शहर कॉँग्रेसच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी वीज वितरण कंपनी व शासनाविरोधात तसेच निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारनियमन रद्द करावे, २४ तास वीजपुरवठा सुरळीत करावा अशा मागण्या करण्यात आल्या. संतप्त महिलांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चूल मांडून स्वयंपाक केला. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात कॉँग्रेसच्या माजी महापौर ताहेरा शेख, नगरसेवक फकीर मोहंमद, सलीम टॅक्सीवाले, नजीर फल्लीवाले, नजीर अहमद इर्शाद अहमद, इब्राहीम दादामिया, नगरसेवक कमरुन्निसा, जैबुन्निसा, तुराबअली साहेबअली, पप्पू अनाउन्सर, फारूख खान फैजुल्ला खान, जैनू पठाण, मौलाना अय्युब कासमी, अस्लम अन्सारी, शकील जानी बेग आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या.
मालेगावी मोतीभवनवर कॉँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 11:43 PM