नाशिकची जबाबदारी बाळासाहेब थोरातांवर; लोकसभेसाठी निरीक्षक
By श्याम बागुल | Published: August 6, 2023 01:45 PM2023-08-06T13:45:30+5:302023-08-06T13:45:56+5:30
वाघमारे, ब्रीज दत्त समन्वयक
नाशिक : दहा महिन्यांवर येवून ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीची तयारी काँग्रेसने सुरू केली असून, जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदार संघातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना समजून घेत त्यादृष्टीने पक्षाची तयारी करण्याचे तसेच पक्ष नेतृत्वाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्यातील लोकसभा मतदार संघ निहाय निरीक्षकांची नेमणूक केली आहे. त्यात नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदार संघाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या शिवाय नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवरही अन्य मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघ विरोधकांच्या ताब्यात असून, नाशिक व दिंडोरी (पुर्वीच्या मालेगाव) या लोकसभा मतदार संघावर काही वर्षापुर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र गेल्या दोन दशकांपासून हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यातून सुटला आहे. त्यानंतर पक्षाला सातत्याने पराभव पत्कारावा लागला अथवा आघाडी सोबत राहून पाठिंबा द्यावा लागला आहे. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीतही यापेक्षा वेगळे चित्र नसेल परंतु तरिही लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेची तयारी करण्याचा विचार काॉग्रेसने केला आहे.
आत्तापासूनच मतदार संघ निहाय निरीक्षक नेमून त्या आधारे राजकीय, सामाजिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदार संघासाठी वरिष्ठ निरीक्षक म्हणून बाळासाहेब थोरात यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांना राजू वाघमारे, ब्रीज दत्त हे दोघे समन्वयक म्हणून काम करतील.