नाशिक : महापालिका निवडणुकीत कोणत्याही प्रकारे मनसेशी आघाडी करायची नाही, असे दिल्लीहून आदेश असल्याचे सांगणाऱ्या कॉँग्रेस पक्षाने नाशिकमध्ये दोन प्रभागांत मनसेला बरोबर घेतले असून, एका प्रभागात तर कॉँग्रेस-मनसे आणि राष्ट्रवादीची अजब आघाडी तयार झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील सत्ताधिकाऱ्यांच्या चुका निवडणूक प्रचारात मांडू, असे सांगणाऱ्या कॉँग्रेसच्या नेत्यांची यामुळे अडचण झाली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले, त्यावेळी नाशिकमध्ये आलेले पक्षाचे नेते भाई जगताप यांनी कुठल्याही परिस्थितीत भाजपा, सेना, मनसे आणि एमआयएम यांच्याशी आघाडी करण्यात येणार नाही, तसे पक्षाचे धोरण ठरले असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. महापालिकेत सत्तास्थानी असलेल्या भाजपाने गेल्या पाच वर्षांत शहराचा कोणताही विकास केला नाही, तसेच अनेक चुकीचे निर्णय घेतले. ते नागरिकांसमोर प्रचारात मांडणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र महापालिकेत मनसेबरोबरच कॉँग्रेस सत्तेत आहे, हे सांगितल्यानंतर कॉँग्रेसने चुकीच्या गोष्टींना विरोध केला होता, त्याची नोंद इतिवृत्तात असल्याचे सांगितले होते. मात्र आता दोन प्रभागात कॉँग्रेसने मनसेच्या उमेदवारांची मदत घेतली आहे. मनसेच्या उमेदवारांसमवेत कॉँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आता मनसेच्या विरोधात कसा प्रचार करणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. दरम्यान, सध्या महापालिकेत कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्ष अशी आघाडी असून, याच आघाडीच्या माध्यमातून या दोन प्रभागांत सामोरे जात आहेत.
कॉँग्रेस-मनसे-राष्ट्रवादीची नाशिकमध्ये महाआघाडी?
By admin | Published: February 07, 2017 12:36 AM