नाशिक : महाशिव आघाडीसाठी शिवसेनेच्या वतीने कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही पक्षांचे नगरसेवकदेखील सोमवारी (दि.१८) सहलीसाठी रवाना झाले आहेत. या पक्षांनी थेट कोणत्याही प्रकारची मागणी केली नसली तरी आता मात्र उपमहापौरपदासह काही पदांची अपेक्षा असून, त्यावर तडजोडी सुरू आहेत.महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने विरोधकांची मोट बांधण्याची तयारी केली आहे. त्यांच्या कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरच चर्चा सुरू आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपाबरोबर जाण्याची शक्यता नसली तरी शिवसेनेला साथ देण्याविषयीदेखील त्यांनी स्पष्ट केलेले नाही.कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याचे मान्य केले, तर कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी मात्र पक्षाचे सहा आणि एक समर्थक अपक्ष असे एकत्रित निर्णय घेतील, असे सांगितले. तर दुसरीकडे राष्टÑवादीच्या नगरसेवकांनी रविवारी समीर भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर सोमवारी मात्र नगरसेवक सहलीवर रवाना झाले. राष्टÑवादीचे सर्व नगरसेवक भुजबळ फॉर्म येथे जमले होते. समीर भुजबळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर खासगी मोटारीने सर्वजण रवाना झाले.कॉँग्रेस पक्षाचे नगरसेवक सायंकाळी राका कॉलनी येथे कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे यांच्या कार्यालयात जमले होते. याठिकाणी शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांच्यासमवेत चर्चा झाल्यानंतर रात्री कॉँग्रेसचे सर्व नगरसेवक सहलीवर रवाना झाले.राष्टÑवादीचे सर्व नगरसेवक एकत्र असले तरी त्यांना सहज म्हणून अन्यत्र पाठविले जात आहे. यात विशेष असे काहीच नाही. पक्षाच्या नेत्यांनी सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले असून, आता त्यासंदर्भात प्रदेश कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. बुधवारी (दि.२०) अर्ज दाखल करण्याच्या वेळी त्यावर योग्य तो निर्णय होईल.- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
कॉँग्रेस-राष्टÑवादीचे नगरसेवक स्वतंत्र्यरीत्या सहलीवर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:23 AM