सकारात्मक चर्चा, लवकरच निर्णय : नाशिक पदवीधर निवडणूकनाशिक : आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी होण्याची शक्यता असून, याबाबतचा फैसला येत्या आठवडाभरात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शनिवारी (दि. १५) यासंदर्भात मुंबईत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीस कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे- पाटील, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, गटनेते जयंत पाटील यांच्यासह आघाडीचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पदवीधरसह शिक्षक मतदारसंघासह अन्य मिळून ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. येत्या काही दिवसांत आघाडीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाने सर्वांत आधी डॉ. प्रशांत पाटील यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर त्यापाठोपाठ कॉँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते- पाटील यांना नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी तयार केल्याने कॉँग्रेसपुढील डोकेदुखी वाढली आहे. मात्र नुकतेच नाशिक दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे- पाटील यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा निर्णय शनिवारी होणार असल्याचे सूतोवाच केले होते. मात्र शनिवारी आघाडीचा निर्णय होऊ शकला नाही. संपूर्ण राज्यात केवळ पदवीधरच नव्हे तर शिक्षक अन्य मतदारसंघ मिळून जवळपास ११ जागांसाठी निवडणुका होत असल्याने त्यासाठी आघाडीचा निर्णय कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीला घ्यावा लागणार असल्याची चर्चा शनिवारी आघाडीच्या बैठकीत झाल्याचे कळते. (प्रतिनिधी)
कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची शक्यता
By admin | Published: October 16, 2016 2:38 AM