'काँग्रेस-राष्ट्रवादीनं विकासाचा मुद्दा उपस्थित करावा', रावसाहेब दानवेंचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 06:47 PM2019-03-17T18:47:49+5:302019-03-17T18:48:32+5:30
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, आम्हाला मायावती जातीयवादी म्हणतात, पण आमचे लालजी टंडन हे उपमुख्यमंत्री होते.
नाशिक - काँग्रेस राष्ट्रवादी हे आम्हाला जातीवादी म्हणतात, ते इतर मुद्द्यांवरुन आम्हाला लक्ष्य करतात. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीनं विकासाच्या मुद्द्यावरुन आम्हाला लक्ष्य करावं, असं आव्हान देत असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. नाशिक येथील शिवसेना-भाजपा युतीच्या मेळाव्यात बोलताना, दानवेंनी मोदी अन् फडणवीस सरकारच्या विकासाचा पाढाच वाचला.
नाशिक विभागाचा उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा चोपडा सभागृहात सुरू झाला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. ग्राम विकास राज्य मंत्री दादा भुसे यांनी प्रास्ताविक केले
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, आम्हाला मायावती जातीयवादी म्हणतात, पण आमचे लालजी टंडन हे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी मायावतींच्या सरकारसोबत आम्हीच सत्तेत होतो. मग, तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का. ममता बॅनर्जी याही आमच्याच मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री होते. मग, तुम्हीच सांगा आम्ही जातीवादी कसे ? तुमच्याशी न जमल्यास आम्ही जातीवादी का? असा प्रश्न उपस्थित करत रदानवेंनी उपस्थित केला आहे. आमचे नेते, आमचे पंतप्रधान, आमचे राष्ट्राध्यक्ष नेहमीच सांगतात, आम्ही घटना बदलणार नाही, तरीही आघाडीचे नेते चुकीचा प्रचार करुन भाजपा सरकार घटना बदलणार असल्याचे सांगतात. विकासाच्या मुद्द्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी, आघाडीचे नेते मतांच राजकारण करत असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
अटलजींचं तीनवेळेचं सरकार आणि मोदींच्या आताच्या सरकाराने दाखवून दिलंय, की काँग्रेसपेक्षा आम्ही चांगल काम करतोय. मात्र, या आघाडीकडून इतर मुद्द्यांवरुनच युतीला लक्ष्य केलं जातंय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला विकासाचा मुद्दा उपस्थित करण्याचा आव्हान देत असल्याचे दानवेंनी म्हटले. तसेच, पुन्हा एकदा नव्यानं एकत्र येऊन युतीचे 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. गेल्या 5 वर्षात युती सरकारने केंद्रात आणि राज्यात मोठी विकासकामे केली आहेत. शेती, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात महत्त्वाची कामे केली आहेत. मुंबईला कोस्टल रोड केला, मुंबईची मेट्रो केली, नागपूरची मेट्रो केली, पुण्याची मेट्रो केली. जळगावचं एअरपोर्ट केलं, नवी मुंबईचं नवीन एअरपोर्ट आपण करत आहोत, अशी मोठी विकासकामे आपण केली आहेत. शेतकरी कर्जमाफीही केल्याचं दानवेंनी सांगितलं.