नाशिक : भाजपा सरकार सीबीआयचा दुरुपयोग करून नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सुडाचे राजकारण करीत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी आंदोलन केले़ सोनिया गांधी न्यायालयात हजर होत असताना देशभरात झालेल्या आंदोलनाचे पडसाद नाशकातही उमटले. यावेळी टीका करताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने सुब्रह्मण्यम स्वामी यांच्यावर काँग्रेस पक्ष, काँग्रेस विचारधारेला संपविण्याचे काम सोपविले आहे़ स्वामींचा आवाज हा खऱ्या अर्थाने भाजपाचा आवाज असून, देशाचा कारभार व लोकांना न्याय कसा मिळवून द्यावा याची भाजपाला कल्पना नाही़ काँग्रेस नेत्यांवर चिखलफेक करून जनतेचे लक्ष विचलित करणाऱ्या भाजपाकडून सोनिया गांधी व राहुल गांधी यांना टारगेट केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला़ या आंदोलनप्रसंगी माजी मंत्री शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद अहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, सुचेता बच्छाव, वंदना मनचंदा, योगीता अहेर, नगरसेवक राहुल दिवे, वत्सला खैरे, शाहू खैरे, वसंत ठाकूर, सुरेश मारू, बबलू खैरे, स्वप्नील पाटील, उद्धव पवार आदिंसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निदर्शने
By admin | Published: December 19, 2015 11:48 PM