नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हा कॉँग्रेसची बैठक शुक्रवारी होऊन त्यात तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले. राष्टÑवादीशी सन्मानजन्य आघाडी करण्याबरोबरच गत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या वर्तणुकीबद्दल खेद व्यक्त करून जिल्ह्यातील विधानसभेच्या निम्म्या जागा कॉँग्रेसला मिळाव्यात, असा सूर सर्वांनीच लावला.जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील निवडणुकीची तयारी तसेच तालुका अध्यक्षांचे मत जाणून घेण्यात आले. या आघाडीत समसमान जागा मिळाल्यास ही निवडणूक एकत्रितपणे लढावी अन्यथा काँग्रेसने जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढवाव्यात, असेही मत काही कार्यकर्त्यांनी या बैठकीदरम्यान व्यक्त केले.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी, कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना पक्षश्रेष्ठींना कळविण्यात येतील. ते जो निर्णय घेतील त्याचा आदर केला जाईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे.यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी राष्ट्रवादीसोबत सन्मानजनक आघाडी करून एकत्रितपणे निवडणूक लढविणे हे दोन्ही पक्षांच्या हिताचे आहे, असे सांगितले. अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी राखीव मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाने आग्रह धरावा, अशी मागणी केली. या बैठकीस निवृत्ती डावरे, दिगंबर गिते, प्रल्हाद पाटील, साखरचंद कांकरिया, विनायक सांगळे, संजय जाधव, मनोहर आहिरे, सखाराम भोये, संपतराव वक्ते, बाळू जगताप, मधुकर शेलार, भय्या देशमुख, रतन जाधव, अंबादास ढिकले आदी पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित सर्वच तालुकाध्यक्षांनी काँग्रेस पक्षाला बळकटी येण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक सन्मानजनक आघाडी झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याची तयारी दर्शवली. परंतु गत लोकसभा निवडणुकीचे अनुभव पाहता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून सन्मानजनक वागणूक मिळालेली नाही, याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला.
विधानसभेच्या निम्म्या जागांवर कॉँग्रेस पक्षाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:13 AM