नाशिक- काँग्रेस पक्षाचे माजी नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आता भाजपात आहेत. मात्र काँग्रेस पक्षातील त्यांच्या जुन्या सहकारी मंत्र्यांशी त्यांचा संपर्क कायम आहे. त्यांच्याशी बोलणे होते बिचारे दु:खी आहेत. आम्हाला कोणी विचारत नाहीत असे ते जाहीररीत्या सांगतात, असे विखे पाटील यांनी आज नाशिक मध्ये सांगितले.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आज नाशिक मधील एका हॉटेलात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना जुन्या पक्षातील म्हणजे काँग्रेस मधील सहकारी आणि मित्रांशी बोलणे होते का असे विचारल्यावर असे मिश्किल उत्तर दिले. जुन्या सहकाऱ्यांशी बोलणे होते. ते दुःखी आहे. आम्हाला कोणी विचारात नाही असे तेच जाहीररीत्या सांगतात, असेही विखे पाटील म्हणाले. एका अन्य प्रश्नावर खासगीत गप्पा मारताना त्यांनी राज्य मंत्री मंडळातील अनेक मंत्री वेगवेगळे मते व्यक्त करतात. कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांना खूप स्वातंत्र्य दिले आहे असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभरात २७ संघटना आहेत, मात्र सर्व वेगवेगळ्या पध्दतीने काम करीत असल्याने आरक्षणाबाबत सरकारवर दबाव पडत नाही. त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्र येऊन सामुहीक नेतृत्व करण्याची गरज असल्याचे मतही विखे पाटील यांनी व्यक्त केले.नाशिकमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना विखे पाटील यांनी हे मत व्यक्त करतानाच मराठा आरक्षणाबाबत नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचेही सांगितले. तसेच आरक्षणप्रकरणी प्रामुख्याने राज्य सरकारची जबाबदारी असून त्यांनी ती पार पाडली पाहिजे असेही मत व्यक्त केले..