मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरवाढी विरोधात निदर्शने करीत कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे यांना कळवण तालुका युवक काँग्रेस व कळवण शहर काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. तसेच महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला.
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराचा प्रभाव सर्वच वस्तूंवर झाला आहे. शेतकऱ्यांनासुध्दा याचा फटका बसला असून त्यांना शेती करणे कठीण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. महागाईमुळे जनता त्रस्त असताना मोदी सरकार मात्र अद्यापही जनतेला खोटी आश्वासने देत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराचा कळवण तालुका युवक काँग्रेस व कळवण शहर काँग्रेस कमिटीने निषेध नोंदविला. तसेच जीवनाश्यक वस्तूंची दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.
तहसीलदार कापसे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर निचांकी असताना मोदी सरकार भरमसाट कर लावून लूट करीत आहे. पेट्रोल, डिझेलवर १८ रुपये रस्तेविकास सेस व ४ रुपये कृषी सेसच्या माध्यमातून घेतले जात आहेत. डिझेलवर ८२० टक्के, तर पेट्रोलवर २५८ टक्के अबकारी कर लावला आहे. मोदी सरकारने पेट्रोल - डिझेलवरील करांमधून मागील सात वर्षांत तब्बल २२ लाख कोटींची नफेखोरी केली आहे. करांशिवाय पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे प्रतिलीटर आणि ३३ रुपये ४६ पैसे आहे. उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थींनाही एवढे महाग सिलिंडर घेणे परवडत नाही. काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल ७२ रुपये, तर सिलिंडर ४०० रुपयांना मिळत होते. डिझेल महाग झाल्याने सार्वजनिक तसेच मालवाहतूकही महाग झाली आहे. खाद्यतेल २००रुपये लीटर झाले असून, डाळींचे भावही गगनाला भिडले आहेत. यावेळी गणेश पगार, बाळा मुसळे, राहुल पगार, कुंदन बस्ते, विजय पगारे, सागर पवार आदी उपस्थित होते.
फोटो - १० कळवण २
कळवण येथे तहसीलदार बी. ए. कापसे यांना निवेदन देताना सागर जगताप, प्रशांत पगार, गणेश पगार, बाळा मुसळे, राहुल पगार, कुंदन बस्ते, विजय पगारे, सागर पवार आदी.
100721\10nsk_31_10072021_13.jpg
कळवण येथे तहसीलदार बी ए कापसे यांना निवेदन देताना सागर जगताप , प्रशांत पगार , गणेश पगार , बाळा मुसळे , राहुल पगार , कुंदन बस्ते , विजय पगारे , सागर पवार आदी.