नाशकात कॉँग्रेसची पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 06:38 PM2020-06-29T18:38:16+5:302020-06-29T18:45:45+5:30
देशात सातत्याने होत असलेल्या पेट्रल आणि डिजेल्याच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन नाशिकमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने तोंडाला मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे भान राखत केंद्र शासनाच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.
नाशिक : देशात सातत्याने होत असलेल्या पेट्रल आणि डिजेल्याच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन नाशिकमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने तोंडाला मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे भान राखत केंद्र शासनाच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. हे वाढते दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्याची गरज असल्याचे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाच्या महामारीने जनता बेहाल असून, कोट्यवधी नागरिकांना त्यांची नोकरी, धंदा टिकवण्याची चिंता लागली आहे. अनेकांवर तर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा परिस्थितीत जनतेला कुठूनच दिलासा मिळत नसल्याने जनता त्रस्त झाली आहे. त्यात ७ जूनपासून दररोज पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनांचे दर सातत्याने वाढत आहेत. शनिवारपर्यंतची दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये लिटरमागे ९ रुपये १२ पैसे, तर डिझेलमध्ये ११ रुपये इतकी दरवाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दर निच्चांकी स्तरावर असताना त्याचा फायदा ग्राहकांना देण्यात आला नव्हता. २०१४ या वर्षी पेट्रोलवर ९ रुपये ४० पैसे, तर डिझेलवर ३ रुपये ६५ पैसे एवढेच शुल्क केंद्र शासनाच्या वतीने आकारले जात होते. मात्र, अवघ्या सहा वर्षांत हे शुल्क पेट्रोलला ३२.९८ तर डिझेलला ३१.८३ रुपये इतके आकारले जात आहे. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रचंड भाववाढ होत असून, ते कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी कॉँग्रेसच्या नाशिक शाखेच्या वतीने करण्यात आली. कॉँग्रेस कमिटीच्या नाशिक शहर कार्यालयासमोर जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन पार पाडले. यावेळी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.