अर्णब गोस्वामीच्या विरोधात देशभर काँग्रेसच्या वतीने आंदोलने केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी गोस्वामीला वाचविण्याचा प्रयत्न केंद्राकडून केला जात असल्याचा आरोप करीत केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली. अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी यांच्या व्हॉट्सॲप चॅटमधून पुलवामा हल्ला करण्यापूर्वीच तीन दिवस आधीच झालेली चर्चा गंभीर आहे. हा राष्ट्रद्रोह असून देशाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. भाजप सरकारमधील बड्या नेत्याकडूनच ही माहिती दिल्याचा आरोप होत असून या बड्या नेत्याचे नाव पुढे येऊ नये म्हणूनच केंद्र सरकार कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.
नाशिकमध्येही शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसने धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गोस्वामीच्या अटकेची मागणी करण्यात आली. भाजप सरकारचाही निषेधही यावेळी आंदोलनकांनी नोंदविला. सरकारने त्वरित कारवाई न केल्यास देशभर तीव्र आंदोलनाचा यावेळी इशारा देण्यात आला. आंदोलनात शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक शाहू खैरे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नरसेविका डाॅ. हेमलता पाटील, कल्पना पांडे, बबलू खैरे, सुरेश मारू आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
(फोटो: २२पीएचजेएन६५)