नाशिक- वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप तसेच एकमेकाच्या सरकारच्या विरोधात येऊन प्रसंगी नेत्यांचे पुतळे जाळणारे शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीचे नेते एकत्र झाले आणि बुधवारी (दि.२७) एकत्र आले आणि जल्लोष केला. निमित्त होते ते राज्यातील महाशिवआघाडीच्या सत्ता स्थापनेचे! राज्यात आलेल्या या सत्तेचा महिमा नाशिकमध्ये दिसून आला.
शालीमार चौकात शिवसेना भवनासमोर महाविकास आघाडीच्या स्थापनेप्रित्यर्थ जल्लोष करण्यात आला. आणि त्यात शिवसेनेबरोबरच कॉंग्रेस आणि राष्टÑवादीचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. कॉँग्रेस प्रवक्तया डॉ हेमलता पाटील आणि शिवसेना महिला आघाडीच्या सत्यभामा भाडेकर तसेच शिवसेना सोडून राष्टÑवादीत गेलेल्या शोभा मगर यांनी चक्क फुगड्या खेळल्या तर अन्य नेते देखील एकमेकांच्या गळ्यात गळे घालून नाचत होते. हे अभिनव दृष्य पाहण्यासाठी शालीमार चौकात गर्दी झाली होती.
जल्लोषात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, प्रदेश उपाध्यक्ष अर्जुन टिळे, शिवसेनेचे महानगर प्रमुख सचिन मराठे,महेश बिडवे, मनपातील विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मंगला भास्कर, मंदाताई दातीर, भारती जाधव, श्यामला दीक्षीत यांच्यासह अन्य पदाधिकारी नगरसेवक सहभागी होते. यावेळी शिवसेना तसेच उध्दव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.