लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : कॉँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांनी रविवारी अचानक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने कॉँग्रेसला खिंडार पडले आहे. मात्र या प्रवेश सोहळ्यास तालुक्यातील सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना अंधारात ठेवल्याने सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.बागलाण तालुक्यातील ताहाराबाद गट म्हणजे कॉँग्रसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांचे होमग्राउंड. या गटाचे कॉँग्रसचे माजी जिल्हापरिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांनी आज अचानक नाशिक येथील शिवसेनेच्या सेना भवनमध्ये जाऊन शिवबंधन बांधून घेतले. आज दुपारी सेनेचे तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांना सोबत घेऊन जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या उपस्थितीत डॉ. सोनवणे यांनी बापू सोनवणे, भाऊसाहेब नांद्रे, यशवंत काळजांदे, विनोद वाघ, पुरषोत्तम भामरे, नाना वाघ, रोहिदास बोरसे यांच्यासह कार्यकर्ते सेनेत दाखल झाले. जिल्हाप्रमुख तांबडे यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रवीण जाधव, अनिल ढिकले, संदीप गुळवे, मधुकर महाजन, कैलास नंदन, गोविंद महाजन, विलास सोनवणे, बंडू गावली, यशवंत नवसार, उत्तम मानकर, अशोक नंदन, सतीश नांद्रे, एकनाथ महाजन, गणेश नंदन, रोहिदास मानकर आदी उपस्थित होते.दरम्यान, डॉ.सोनवणे यांच्या सेना प्रवेशामुळे मोसम खोर्यात कॉंग्रेसला खिंडार पडले असले तरी या प्रवेश सोहळ्यास तालुक्यातील सेनेच्या प्रमुख पदाधिकार्यांना अंधारात ठेवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून डॉ.सोनवणे यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्हा कार्यकारिणीवर कुणाचा पत्ता कट होतो याबाबत सेना वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
बागलाणमध्ये कॉँग्रेसला खिंडार
By admin | Published: May 29, 2017 12:29 AM