काँग्रेसची स्वबळासाठी चाचणी; महाआघाडी की एकला चलो रे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 02:51 PM2021-11-30T14:51:47+5:302021-11-30T15:02:12+5:30
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपाला रोखण्यासाठी आगामी सर्व निवडणुका आघाडी करूनच लढण्याचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी वेळोवेळी जाहीर ...
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपाला रोखण्यासाठी आगामी सर्व निवडणुका आघाडी करूनच लढण्याचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी वेळोवेळी जाहीर केले होते. परंतु काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर त्यांनी मात्र वेगळाच सूर आळवला. काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी पक्षाने स्वबळावर लढण्याची भाषा त्यांनी सुरू केली. ज्या ठिकाणी काँग्रेसचे बळ आहे तेथे पटोले यांचे स्वबळाचे स्वागत करण्यात आले. मात्र, ज्या ठिकाणी पक्षाची ताकद क्षीण आहे, त्या ठिकाणी स्थानिक नेतृत्त्वाची गोची झाली आहे. अगोदरच पक्ष इतरांवर अवलंबून असताना त्यात स्वबळ आजमायचे म्हटल्यावर उमेदवार शोधण्यापासून सुरुवात करण्याची वेळ आली आहे.
काँग्रेसचा एकच आमदार
* नाशिक जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.
* गेल्या विधानसभा निवडणुकीत इगतपुरी व मालेगाव मध्य मतदार संघात काँग्रेसचे दोन आमदार होते.
* गेल्या निवडणुकीत इगतपुरी मतदार संघातून काँग्रेसचे हिरामण खोसकर हे निवडून आले.
* हिरामण खोसकर मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, पक्षानेच त्यांना काँग्रेसमध्ये पाठविले होते.
लवकरच निवडणुका
* आगामी काळात जिल्ह्यातील कळवण, पेठ, सुरगाणा, देवळा, निफाड या पाच नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत.
* नगरपंचायत आटोपल्यानंतर डिसेंबर महिन्यात आठ नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
* या निवडणुकांचा माहोल आटोपत नाही तोच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा कार्यक्रम जाहीर होईल.
जिल्हा परिषदेत काँग्रेसला टेकू
* जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता असून, या सत्तेत काँग्रेस सहभागी आहे.
* जिल्हा परिषदेत काँग्रेसचे आठ सदस्य निवडून आले होते. मात्र, कालांतराने त्यातील अनेकांनी शिवबंधन बांधले तर काही भाजपाबरोबर गेले.
* सध्या जिल्हा परिषदेत एकमेव सभापतीपद काँग्रेसच्या वाट्याला आहे.
लोकसभेत इतरांच्या सतरंजा उचलल्या
* नाशिक जिल्ह्यात लोकसभेच्या अडीच जागा असल्या तरी, काँग्रेसला त्यातील एकही जागा सोडण्यात आलेली नाही.
* दोन मतदार संघात भाजपाने बाजी मारली तर एका मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला.
* काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत फक्त मित्रपक्षांच्या सतरंजा उचलण्याचे काम केले.
पंचायत समित्यांमध्ये जेमतेम यश
* जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांपैकी एकाही पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसची सत्ता नाही.
* काही पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीला बरोबर घेऊन उपसभापतीपद काँग्रेसला पदरात पाडून घ्यावे लागले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणतात...
पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने बैठका, कार्यकर्त्यांशी चर्चा व इच्छुकांचा शोध घेतला जात आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार पक्षाबरोबर कायम राहिला आहे.
- डॉ. तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष