नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर याबाबत अनिश्चतता असतांना कााँग्रेसने मात्र नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा पक्ष निरीक्षक डॉ. उल्हास पाटील यांनी केली आहे. या संदर्भात निरीक्षक पाटील, प्रभारी राजू वाघमारे यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणूक पूर्वतयारी बैठकीसाठी काँग्रेसच्या शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच बैठक घेण्यात आली, त्यात ते बोलत होते. त्याकरता डॉक्टर उल्हास पाटील अध्यक्ष स्थान होते.
आगामी काळात बूथ पासून ब्लॉक पर्यंत तसेच तालुकास्तरावर ग्रामीण भागात शहरात कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करून येणाऱ्या काळात लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेस पक्ष निवडून येईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्याचे प्रभारी डॉक्टर राजू वाघमारे यांनी, लवकरच नाशिक जिल्ह्याचा तालुका, तालुकास्तरावर दौरा करणार असल्याची माहिती दिली. काँग्रेसचा व राहुल गांधींचा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर असून, त्यातून निवडणुकीतील यश मिळेल असे त्यांनी सांगितले. आगामी काळामध्ये शहर व जिल्ह्यात बस यात्रा तसेच पदयात्रा नाना पटोले, विजय वडेट्टीवार व बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती सहप्रभारी ब्रिजकिशोर दत्त यानी दिली.