नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीने जशी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत तशीच ती पक्षीय रंगही बदलण्यास कारणीभूत ठरल्याचे चित्र आहे. मंगळवारी (दि.२१) जिल्हा परिषद सभागृहात दाखल झालेल्या कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांचे भगवे फेटे त्यामुळेच चर्चेत राहिले. सभागृहात दुपारी एक वाजता दाखल झालेल्या शिवसेनेच्या २५ सदस्यांसह अपक्ष शंकर धनवटे व कॉँग्रेसच्या आठ सदस्यांनीही भगवे फेटे बांधले होते. मात्र त्यांच्या भगव्या फेट्यात मधोमध कॉँग्रेसचा तिरंगा रंगाचे पंजाचे चिन्हही होते. त्यामुळे शिवसेना व कॉँग्रेसच्या भगव्या फेट्यांमुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहातील वातावरण भगवेमय होते. भाजपा व राष्ट्रवादीने माकपा तटस्थ राहत असल्याचे गृहीत धरून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची लॉटरी खेळण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र माकपा गटनेते रमेश बरफ हेच तटस्थ राहिल्याने भाजपा व राष्ट्रवादीच्या अपेक्षा तेथेच मावळल्या. माकपाच्या तीनही सदस्यांना व्हीप बजावला नसल्याने माकपाचे गटनेते रमेश बरफ वगळता माकपचे अन्य दोन सदस्य अनिता गोरख बोडके व ज्योती जाधव यांनी आधी अध्यक्षपदासाठी शिवसेनेला व नंतर उपाध्यक्षपदासाठी कॉँग्रेसला मतदान केले. यात सुरुवातीला केवळ अपक्ष रूपांजली माळेकर व माकपाच्या अनिता बोडके याच मतदानात सहभागी होणार असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात सभागृहात मतदानाच्या वेळी माकपाच्या अनिता बोडके यांच्यासह ज्योती जाधव यांनीही मतदानात सहभागी होत शिवसेना- कॉँग्रेसकडून माकपाच्या सदस्यांना दिल्या जाणाऱ्या सभापतिपदाच्या दावेदारीत आपणही सभापतिपदाचे उमेदवार असल्याचेच मतदानात सहभागी होऊन दर्शविल्याची चर्चा आहे. माकपाच्या तीनपैकी दोन सदस्यांनी निवडणुकीत सक्रियता दाखविल्याने भाजपा- राष्ट्रवादीसाठी ती अस्वस्थतेत भर टाकणारी ठरली. (प्रतिनिधी)
भगव्या फेट्यात कॉँग्रेसचा ‘तिरंगा’
By admin | Published: March 22, 2017 1:40 AM